एअर इंडियाच्या ‘महाराजा’च्या शिल्पाची निर्मिती कुठे झाली माहित आहे?

मुंबई तक

• 02:00 AM • 09 Oct 2021

गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडियाचे बोधचिन्ह म्हणून वापरत असलेल्या ‘महाराजाचे’ शिल्प पनवेल या ऐतिहासिक नगरीत घडले आहे. पनवेल शहरातील महात्मा फुले मार्गावरील जोगळेकर वाड्यात माईणकर या नावाचे एक शिल्पकार राहत होते. मातीच्या बाहुल्या, खेळणी व विविध मूर्ती बनविण्याचा त्यांचा छोटासा कारखाना या वाडयात होता. 1955-56 च्या दरम्यान एअर इंडियाने बोधचिन्हासाठी वृत्‍तपत्रांत जाहिरात दिली होती. ही […]

Mumbaitak
follow google news

गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडियाचे बोधचिन्ह म्हणून वापरत असलेल्या ‘महाराजाचे’ शिल्प पनवेल या ऐतिहासिक नगरीत घडले आहे. पनवेल शहरातील महात्मा फुले मार्गावरील जोगळेकर वाड्यात माईणकर या नावाचे एक शिल्पकार राहत होते. मातीच्या बाहुल्या, खेळणी व विविध मूर्ती बनविण्याचा त्यांचा छोटासा कारखाना या वाडयात होता.

हे वाचलं का?

1955-56 च्या दरम्यान एअर इंडियाने बोधचिन्हासाठी वृत्‍तपत्रांत जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून माईणकरांनी स्वत: तयार केलेली महाराजाची मूर्ती एअर इंडियाकडे पाठवून दिली. विनयाने कमरेत वाकून उजव्या हाताने या असे खुणवीत स्वागत करणार्‍या भारतीय पेहरावातील महाराजाचे हे अभिजात ‘शिल्प’ एअर इंडियाच्या पसंतीस उतरले.

माईणकरांनी तयार केलेले हे महाराजाचे शिल्प एअर इंडियाने बोधचिन्ह म्हणून वापरायचे ठरविल्यावर या शिल्पाचे सर्वाधिकार पाच हजार रूपयांत माईणकरांकडून विकत घेतले आणि माईणकरांचा हा महाराजा एअर इंडियाचे बोधचिन्ह होऊन सार्‍या जगभर दिमाखात फिरु लागला.

कालांतराने माईणकरांची परिस्थिती हालाखीची झाली. त्यांचा खेळणी बनविण्याचा कारखाना बंद पडला. माईणकर कर्जबाजारी झाले. हातात काम नाही, जवळ पैसा नाही; अशा बिकट परिस्थितीत पनवेलमधील सेंट फ्रांन्‍सिस चर्चमधील काही ख्रिस्ती व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला.

हालाखीच्या परिस्थितीला कंटाळलेल्या माईणकरांनी ख्रिस्ती धर्माचा स्विकार केला. ख्रिस्ती झाल्यावर ते पनवेल सोडून अहमदनगरला कायमचे वास्तव्यास गेले. तिथेच एअर इंडियाच्या महाराजाची अजरामर शिल्पकृती बनवणाऱ्या या शिल्पकाराचा अंत झाला, अशी माहिती पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक,लेखक आणि छायाचित्रकार सुधाकर लाड यांनी संशोधित आणि संकलित केली आहे.

जेआरडी टाटांनी सुरू केली होती एअर इंडिया

एअर इंडिया कंपनीची स्थापना टाटा उद्योग समूहाचे प्रमुख जेआरडी टाटा यांनी केली होती. जेआरडी टाटा स्वतः वैमानिक होते. त्यामुळे या कंपनीचं नाव टाटा एअर सर्विस असं ठेवण्यात आलं होतं. १९३८ मध्ये कंपनीने देशातंर्गत विमानसेवा सुरू केली होती. दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतर कंपनीचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.

एअर इंडियाचा ताबा आता पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षांहून अधिक काळांनी टाटांकडे आला आहे. आज लिलावात टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी करून पुन्हा एकदा त्याचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. Welcome Back Air india असं म्हणत रतन टाटांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे.

    follow whatsapp