युद्ध सुरु असताना सैनिकांनी घरात बसून कसं चालेल? गरोदरपणातही महिला डॉक्टर करतेय कोरोना रुग्णांची सेवा

मुंबई तक

• 03:06 PM • 09 May 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याच्या अनेक बातम्या आपल्याला वाचायला मिळत आहेत. परंतू या खडतर परिस्थितीतही काही डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेत स्वतःला झोकून देत आहेत. बदलापुरातील गौरी हॉल या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. रुपाली मोहिते यांची कहाणीही अशीच कौतुकास पात्र आहे. स्वतः […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याच्या अनेक बातम्या आपल्याला वाचायला मिळत आहेत. परंतू या खडतर परिस्थितीतही काही डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेत स्वतःला झोकून देत आहेत. बदलापुरातील गौरी हॉल या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. रुपाली मोहिते यांची कहाणीही अशीच कौतुकास पात्र आहे. स्वतः गरोदर असताना आणि एकदा कोरोनाची लागण होऊन झाल्यानंतरही रुपाली मोहीते आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेचं आपलं कर्तव्य बजावत आहेत.

हे वाचलं का?

सहा महिन्यांच्या गर्भवती असतानाही डॉ. रुपाली मोहिते आपल्या तब्येतीचं कारण देऊन घरी बसल्या नाहीत. “बाहेर युद्ध सुरु असताना सैनिकांनी घरात बसून कसं चालेल असं माझे पती मला म्हणाले. या कामासाठी त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. म्हणून मी इथे येऊन माझं रोजचं काम करु शकते आहे”, रुपाली मोहिते मुंबई तक शी बोलत होत्या. कोविड सेंटरमधल्या आपल्या सहकारी व घरच्यांच्या पाठींब्याच्या जोरावर डॉ. रुपाली आपल्या होणाऱ्या बाळासोबतच रुग्णांचीही काळजी घेत आहेत.

“मागच्या वर्षी मार्च महिन्यात जेव्हा पहिल्यांदा लॉकडाउन लागला तेव्हापासून मी इथेच आहे. मध्यंतरी वर्षभर मी ओपीडीमध्ये काम करत होते. ज्यावेळी मी गरोदर राहिले त्यावेळी सुरुवातीचे एक-दोन महिने मी घरात विश्रांती घेतली. मध्यंतरीच्या काळात मलाही कोरोनाची लागण झाली पण त्यातून सावरल्यानंतर मी लगेच कामावर जॉईन होण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचं स्वरुप हे किती भयंकर असू शकतं हे आम्ही आमच्या घरात अनुभवलं आहे. त्यामुळे या कामासाठी मानसिक आधार मिळणं गरजेचं होतं आणि माझ्या घरच्यांनी तो सपोर्ट मला दिला”, डॉ. मोहीते आपल्या घरच्यांनी दिलेल्या सपोर्टबद्दल बोलत होत्या.

“माझे पती मला म्हणाले की बाहेर युद्ध सुरु असताना सैनिकांनी घरात बसून कसं चालेल. त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णांना माझी गरज असताना मला घरात बसून चालणार नाही. सावित्रीबाई फुलेंनी प्लेगच्या साथीत अशीच रुग्णांची सेवा केली होती. यासारख्या महान लोकांच्या कामांमधून मला प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेमुळेच मी दररोज माझी तब्येत सांभाळून ८ तास काम करते आहे.” डॉ. रुपाली यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकारीही त्यांची तितकीच काळजी घेतात.

रुपालीकडीन खूप काही शिकण्यासारखं आहे. तिच्याप्रमाणेच तिचं बाळही खरंच शूर आहे. स्वतः गरोदर असतानाही ती दररोज ८ तास आपली शिफ्ट करुन रुग्णसेवेत आपलं योगदान देत आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. ती जेव्हा पुन्हा जॉईन होणार असं आम्हाला कळलं त्यावेळी आम्ही तिच्या मागे लागून तिला गौरी हॉलच्या कोविड सेंटरलाच यायला सांगितलं. ती आल्यामुळे आमच्यावरचा भारही थोडा हलका झाला अशी प्रतिक्रीया डॉ. रुपाली यांच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. एकीकडे कोरोनामुळे आजुबाजूला नकारात्मक वातावरण असताना डॉ. रुपाली मोहीते यांच्यासारखे डॉक्टर हे मानवतेवरचा विश्वास अजून मजबूत करतात.

    follow whatsapp