इंडोनेशियाची राजधानी जकार्तात भूकंपाच्या झटक्यामुळे विध्वंस झाला. बहुमजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. भूकंपाच्या घटनेत मोठी जीवितहानी झाली असून, 162 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रती 5.6 रिश्टर स्केल इतकी होती.
ADVERTISEMENT
इंडोनेशियात झालेल्या भूकंपामुळे जीवित आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यांखाली लोक दबले गेलेले आहेत. लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय.
भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रातांतील डोंगराळ भागात असलेल्या सियानजुर शहराजवळ होता. सोमवारी दुपारी भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर लोक घाबरले आणि घरांमधून बाहेर पडले.
भूकंपाची तीव्रता जास्त असल्यानं अनेक मोठ्या इमारती कोसळल्या. या दुर्घटनेत जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असून, जखमींचा आकडाही मोठा आहे. सियानजुर रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये जखमींवर उपचार केले जात आहे.
पार्किंगमध्ये उपचार घेत असलेल्या 48 वर्षीय कुकू यांनी रॉयटर वृत्तसंस्थेला सांगितलं की, “अचानक भूकंपाचे झटके बसले आणि इमारत कोसळली. सर्व काही जमीनदोस्त झालं. मी दबलो गेलो. माझे दोन मुलंही दबले गेले होते. मी त्यांना कसंतरी बाहेर काढलं आणि रुग्णालयात घेऊन आलो.”
इंडोनेशियातल्या पोलिसांचे प्रवक्ता डेडी प्रसेत्यो यांनी भूकंपाबद्दल अंतरा स्टेट न्यूज एजन्सीला सांगितलं की, “मंगळवारी सकाळी बचाव कार्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलंय. आज फक्त पीडितांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढणं आहे.”
राष्ट्रीय आपत्ती एजन्सीने सांगितलं की, 62 लोकांच्या मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इतर 100 लोकांच्या मृत्यूची पडताळणी केली गेलेली नाही. इथे भूस्खलन झाल्यानं रस्ता बंद झाला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
भूकंपामुळे जवळपास 2,200 घरांचं नुकसान झालं आहे आणि 5000 अधिक लोक बेघर झाले आहेत. इंडोनेशियात यापूर्वीही प्रलंयकारी भूकंप झालेले आहेत. 2004 मध्ये उत्तर इंडोनेशियातील सुमात्रा द्वीपावर झालेल्या भूकंपाचे हादरे 14 देशांमध्ये जाणवले होते. 2,26,000 लोक मृत्यूमुखी पडले होते.
ADVERTISEMENT