काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी या दोघांनाही ईडीने नोटीस धाडली आहे. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी आक्रमक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. नॅशनल हेराल्ड हा एक पेपर आहे. त्या प्रकरणी नोटीस पाठवून काय होणार आहे? असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
डरेंगे नहीं, झुकेंगे नहीं सीना ठोकके लडेंगे असं म्हणत रणदीप सूरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात एकीकडे बड्या नेत्यांना नोटीसा धाडल्या जात आहेत त्यानंतर आता दिल्लीत थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
या नोटीशीनंतर काँग्रेसकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर पेजवरून हे ट्विट करण्यात आलं आहे की जर काँग्रेस इंग्रजांच्या अत्याचारांना घाबरली नाही तर ईडीची नोटीस काहीच नाही. सोनिया गांधी, राहुल आणि काँग्रेसची हिंमत कुणीही तोडू शकत नाही. आम्ही लढणार, आम्ही जिंकणार, आम्ही झुकणार नाही आम्ही घाबरणार नाही असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र हे सगळं सूडाचं राजकारण आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.
काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण?
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ५५ कोटींचा गैरव्यवहार याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. २००८ मध्ये एजेएलची सगळी प्रकाशनं बंद केली. या कंपनीवर ९० कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी स्थापन केली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोडा हे कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे ७६ टक्के शेअर्स होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला ९० कोटींचं कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहण केलं होतं.
ADVERTISEMENT