ठाणे: रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यानंतर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. एका माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रामदेब बाबा म्हणाले ”एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत.”
ADVERTISEMENT
काल रामदेव बाबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली होती भेट
आज सकाळीच रामदेव बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला पोहोचले. ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी त्यांनी शिंदेंची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे कालच रामदेव बाबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. रामदेव बाबा नेहमीच भाजप नेत्यांच्या जवळ असल्याची चर्चा असते.
रामदेव बाबा आपल्या प्रतिक्रियेत नेमकं काय म्हणाले?
”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचं आत्मीय प्रेम राहिलं आहे. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मोठ्या विषयांवर संवाद साधला. खूप बरं वाटलं” अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी दिली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले 40 आमदार आणि 12 खासदार शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत आहेत. सध्या शिवसेना आणि शिंदे गटाची लढाई सुप्रिम कोर्टात आहे, त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची हे स्पष्ट नाहीये. उद्धव ठाकरे अजूनही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. परंतु रामदेव बाबांच्या या प्रतिक्रियेमुळे वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT