Uddhav thackeray Birthday : एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे बंडखोरांसाठी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत की नाही, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जाताना दिसतोय. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक ट्विट केलंय. ज्या ट्विटमधून एकनाथ शिंदेंसाठी उद्धव ठाकरे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख राहिले नसल्याची चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस साजरा होत आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आणि सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिला वाढदिवस असून, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना काय उल्लेख करतात याची सर्वांना उत्सुकता होती.
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर एक ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना नेहमीप्रमाणे कोणताही त्यांचा फोटो वापरलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमधून उद्धव ठाकरे हे शिंदे गटासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख राहिलेले नाहीत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना काय म्हटलं आहे?
उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे म्हणतात, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना’, अशा शब्दात शिंदेंनी अभिष्टचिंतन केलं आहे.
Anant Gite: भुजबळ आणि राणे यांचं बंड स्वबळावर, एकनाथ शिंदेचं बंड भाजप पुरस्कृत
एकनाथ शिंदेंनी यापूर्वी म्हणजे २७ जुलै २०२० रोजी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना मात्र उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख असं म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत.
शिवसेनेत शिवसेनाप्रमुख या पदानंतर शिवसेना पक्षप्रमुख पद हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीने निर्णयाचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांना दिलेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेविरोधात बंडखोरी झाल्यानंतर ४० आमदारांसह शिंदे गटात सामील झालेले खासदार शिवसेनेतच असल्याचा दावा करत आहेत.
उद्धव ठाकरे : ‘देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजप असं का वागलं, हे मलाही समजलं नाही’
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख असल्याचंही स्पष्ट केलंय. असं असतानाच शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या शुभेच्छांनी नव्या चर्चेनं तोंड वर काढलंय.
खासदार धैर्यशील माने म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलेला नाही. दुसरीकडे शिंदे गटातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेना पक्षप्रमुख असं म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशावर म्हटलेलं आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड व निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,’ अशा शब्दात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVERTISEMENT