– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी
ADVERTISEMENT
सरकारी अधिकाऱ्यांना अनेकदा कामावर कंत्राटदार किंवा राजकीय कार्यकर्त्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो. अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या बातम्याही आपण वाचल्या आहेत. परंतू बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे चक्क रिव्हॉल्वरची मागणी केली आहे.
कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी केलेल्या मागणीमुळे सध्या जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. कंत्राटदार आपल्याला धमकी देऊन, कट्यार दाखवून बिलावर सह्या करुन घेतात. त्यामुळे आपल्याला काम करता यावं यासाठी रिव्हॉल्वर वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कोकणे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
जाणून घ्या काय लिहीलं आहे कोकणे यांनी आपल्या पत्रात?
कार्यकारी अभियंता या पदावर काम करत असताना जिवीतास संरक्षण मिळणे बाबत ..
महोदय ,
“वरील विषयान्वंये मी, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे दिनांक १६/१२/२०२१ ( म.पू ) कार्यकारी अभियंता या पदावर हजर झालो आहे. मी मुळचा नाशिक येथील रहिवासी असुन शासनाच्या बदलीच्या धोरणानुसार मूळ वास्तव्यापासून ५०० कि.मी. अंतरावर आलो आहे. माझ्यासाठी अंबाजोगाई हा संपूर्ण परिसर अनभिज्ञ व अपरिचीत आहे. येथे हजर झाल्यानंतर देयके अदा करताना माझ्या असे लक्षात आले आहे की यापूर्वी या विभागात संपूर्ण अनागोंदी कारभार झालेला आहे. काही कंत्राटदार येथे कार्यकारी अभियंता विभागीय लेखापाल व इतर कर्मचाऱ्यांकडून धमकीने किंवा कटयार दाखवून बिले तपासून व अदा करुन घेतात.
तसेच काही कंत्राटदारांनी रात्री अपरात्री अडवून अवैध बिलावर सही करा अशी अरेरावी केलेली आहे. तसेच माझ्याविरुध्द येथे अॅट्रॉसिटी दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला येथे सुरळीतपणे काम करण्यासाठी व माझ्या जिवीतास संरक्षणासाठी मला रिवॉलव्हरची गरज आहे. अन्यथा माझ्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी महाशयांस विनंती की, येथील संपूर्ण परिस्थितीची आपल्या स्तरावरुन व पोलीस विभागाकडून छाननी करुन मला एक रिवॉलव्हर उपलब्ध करुन द्यावी. त्याचा मी कुठेही गैरवापर करणार नाही आपणास व शासनाकडे त्याचा वेळोवळी अहवाल देत राहील. आपल्या करिता माहितीस्तंव सविनय सादर.
कोकणे यांनी लिहीलेल्या पत्रामुळे बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात लक्ष घालत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी अभियंता कोकणे यांना संपर्क साधून त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी वर्गाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणायचे काम कोणी करत असेल, तो कोणत्याही पक्ष-संघटनेचा असेल, त्याची गय केली जाणार नाही असंही आश्वासन मुंडे यांनी दिलं आहे.
याचदरम्यान मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक एस. राजा यांना संपर्क करुन कोकणे यांनी लिहीलेल्या पत्राची दखल घेत संबंधितांबद्दल कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ADVERTISEMENT