भारतातील एक महत्वाची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात लाखो लोकांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडून इतर १२० देशांचं नागरिकत्व स्वीकारलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात महत्वाचं म्हणजे ४८ नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडून पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विदेश मंत्रालयाकडून प्राप्त झालेली ही आकडेारी समोर ठेवली. या लोकांनी आपल्या वैक्तिक कारणामुळे भारताची नागरिकता सोडली असल्याचं नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
तीन वर्षात ३ लाख ९२ हजार लोकांनी सोडलं भारताचं नागरिकत्व
मागील तीन वर्षात ३ लाख ९२ हजार लोकांनी भारताची नागरिकता सोडली आहे. विशेष म्हणजे या नागरिकांनी १२० देशांची नागरिकता मिळवली आहे. त्यापैकी सर्वाधिक १ लाख ७० हजार नागरिकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतल्याचं समोर आल आहे. तशी माहिती केंद्र सरकारकडून मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. इतकंच नाही तर या ३ लाख ९२ हजार लोकांपैकी ४८ जण अशे आहेत जे भारत सोडून पाकिस्तानचे नागरिक झाले आहेत.
कोणत्या देशात किती गेले?
एकूण ३ लाख ९२ हजारांमधील अमेरिका येथे १ लाख ७० हजार ७९५, कॅनडा ६४ हजार ०७१, ऑस्ट्रेलिया ५८ हजार ३९१, युके ३५ हजार ४३५, इटली १२ हजार १३१, न्युझीलंड ८ हजार ८८२, सिंगापूर ७ हजार ४६, जर्मनी ६ हजार ६९० तर ४८ नागरिक पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले आहेत, अशी आकडेवारी नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली आहे. मागच्या ३ वर्षांच्या तुलनेत २०२१ या वर्षात सर्वाधिक १ लाख ६३ हजार जणांनी भारत सोडले आहे.
दरवर्षी सव्वा लाख लोक सोडतायेत भारत
मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास ६ लाखपेक्षा जास्त नागरिकांनी भारत सोडून इतर देशांना पसंती दिली आहे. या आकडेवारीनुसार सरासरी काढल्यास दरवर्षी देशातून १ लाख २१ हजार लोक बाहेर पडत नागरिकत्व सोडत आहेत. तर त्या तुलनेत जर भारताची नागरिकता घेणाऱ्यांची संख्या पाहिल्यास मागील पाच वर्षात फक्त ५ हजार २२० लोकांनी भारतीय नागरिकता स्वीकारली आहे. जी सोडणाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. यामध्ये सर्वाधिक ४ हजार ५५२ नागरिक हे पाकिस्तान सोडून भारतात आले आहेत.
ADVERTISEMENT