नागपूर येथील एका शाळेच्या प्राचार्याचं अपहरण अपहरण झाल्याची समोर आली आहे. शहरातील महात्मा गांधी प्रायमरी शाळेचे प्राचार्य प्रदीप मोतीराम रमानी यांचं अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं आहे. सोडून देण्याच्या मोबदल्यात 30 लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अपहरणाची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
फोनवरून मागितली 30 लाखांची खंडणी
संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, महात्मा गांधी शाळेचे प्राचार्य रमानी हे शुक्रवारी घरून काही कामानिमित्त आपल्या मोटारसायकलवरून बाहेर पडले होते. मात्र उशिरा रात्री देखील ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यांच्या मुलीने जेव्हा त्यांच्या नंबरवर फोन केला तेंव्हा अज्ञात व्यक्तीने फोन उचलला आणि रमानी त्यांच्या ताब्यात असल्याचं सांगितलं. परत पाठवण्याच्या बदल्यात त्यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली, तसंच पोलिसांना न सांगण्याची धमकी दिली.
अपहरणाबाबत कळताच कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले
त्यानंतर त्यांचे कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. आणि पोलिसांना त्यांनी घडलेलं घटनाक्रम सांगितलं. पोलिसांनी लागलीच तपास यंत्रणा फिरवल्या. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप रामानी यांची मोटारसायकल मानकापूर स्थित अलेक्सिस रुग्णालयासमोर उभी आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. रमानी यांचा फोन मौदा येथील लोकेशनला ट्रेस झाला आहे. मात्र या व्यतिरिक्त आणखी कोणत्याही प्रकारचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही.
पोलिसांना आहे यांच्यावर संशय
घटनेनंतर पोलीस सर्व संबंधित व्यक्तींची उलटतपासणी करत आहेत. सदरील प्रकार हा शाळेशी निगडित असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे. कारण शाळा व्यवस्थापनाशी प्रदीप यांचा वाद सुरु होता. तशी तक्रार देखील प्रदीप यांनी केली होती. त्यानंतर कमाईपेक्षा जास्त संपत्ती आढळल्याने व्यवस्थापनातील एका व्यक्तीला अटक देखील झाली होती. या प्रकरणात प्रदीप रमानी मुख्य साक्षीदार देखील आहेत. त्यामुळे पोलिसांना संबंधित काही व्यक्तींवर संशय आहे. याबाबतचे अधिक तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT