स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टरची चमूने केलेल्या हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कसरतींची पर्वणी यानिमित्ताने मिळाली.
ADVERTISEMENT
कोव्हिडनंतर दोन वर्षांनी पार पडला एअर शो
कोव्हिडमुळे दोन वर्षांच्या अंतराने यंदा एअर शो झाला. वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी निमंत्रितांना हवाई थरार अनुभवता आला. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, अॅवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्स आदींचा समावेश होता. याप्रसंगी लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी आजूबाजूच्या घरांच्या छतांवर गर्दी केली होती.
एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण होते. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकले.
“आकाशगंगा’ या पथकाच्या १० याेद्धे ८ हजार फूट उंचावर या चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता.
इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँड सादरीकरण पाहायला मिळाले.
आकाशगंगा टिमने तिरंगा ध्वज उंच नेला. आणि शेवटी संघातील तीन सदस्य तिरंगा घेऊन उतरले. हा उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण होता. डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूरकर थक्क झाले. अॅवेरो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान जमिनीपासून ५०० फूट उंचीवर उडत होते.
‘संपूर्ण जगात चार ते पाच देशांमध्ये सूर्यकिरणसारख्या एरोबॅटिक डिस्प्ले टीम आहेत. त्यातील सूर्यकिरण ही सर्वोत्तम अशा स्वरूपाची असून ती देशाचा सन्मान वाढवित आहे’, अशी माहिती सूर्यकिरणच्या चमूतील फ्लाइट लेफ्टनंट आणि टीम कॉमेंटेटर रिद्धिमा गुरुंग यांनी दिली.
अशी आहे सध्याची चमू
‘सूर्यकिरण’च्या सध्याच्या चमूमध्ये ग्रुप कॅप्टन जी. एस. ढिल्लन, विंग कमांडर ए. यादव, विंग कमांडर आर. बोरदोलोई, विंग कमांडर ए. गावकर, विंग कमांडर एन. रैना, विंग कमांडर पी. नेगी, स्क्वॉड्रन लीडर पी. भारद्वाज, स्क्वाड्रन लीडर डी. गर्ग, स्क्वाड्रन लीडर एच. चंदेल, स्क्वाड्रन लीडर एस. दयाल, स्क्वाड्रन लीडर एम. भल्ला, स्क्वाड्रन लीडर अॅलन जॉर्ज, स्क्वाड्रन लीडर एच. सिंग, स्क्वाड्रन लीडर सुदर्शन, फ्लाइट लेफ्टनंट रिद्धिमा गुरुंग यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT