मागच्या २४ तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात अचानक २ ते ३ डिग्रींची वाढ झाली आहे,त्यामुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्हाचे तापमान 45 डिग्री पर्यंत पोहचले आहे तर अनेक जिल्हे सुद्धा 45 डिग्रीच्या जवळ असल्याने नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील. तर पुढचे पाच दिवस अतिउष्णतेची लाट असेल असा इशारा दिला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाली आहे, पुढील काही दिवस कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र हा आठवडा सुरू होताच सुरू पुन्हा तापायला लागला असल्याने अनेक जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्रीच्या पुढे गेले आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने आता कुलर देखील उपयोगाचे नसल्याचं दिसत आहे. तापमान वाढीमुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत, पुढील काही दिवस सूर्याचा प्रकोप कायम राहणार असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे .
होसाळीकरांनी काय म्हटलं आहे?
पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र,दक्षिण कोकणच्या काही भागात मेघगर्जनेची शक्यता आहे असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
विदर्भात दिवसभरात कुठे किती तपमान?
अकोला- ४५.४
अमरावती-४४.४
बुलढाणा-४२.३
ब्रह्मपुरी-४५.२
चंद्रपूर-४३.८
गडचिरोली-४२.८
गोंदिया-४३.५
नागपूर-४४.३
वर्धा-४५.१
वाशिम-४३
यवतमाळ-४४.७
आजचं तापमान लक्षात घेतलं तर अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा या शहरांमध्ये ४५ च्या वर पारा गेला आहे. तर दुसरीकडे अमरावती, नागपूर, यवतमाळ या शहरांमध्ये पारा ४४ च्या पुढे गेला आहे जो येत्या काही दिवसांमध्ये ४५ च्याही पुढे जाऊ शकतो.
ADVERTISEMENT