मुंबई: मुंबईत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून गाड्यांवर कलर कोड ही पद्धत लागू करण्यात आली आहे. यावेळी मुंबई पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी वेगवेगळे कलर कोड जारी करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
सरकारने लॉकडाऊन जारी केलेला असला तरीही अद्यापही अनेक जण विनाकारण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहे. अशाने कोरोना रूग्णसंख्येत वाढ होतेय. त्यामुळेच अशाप्रकारे भटकंती करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोड पद्धत आणली आहे.
मुंबईत लॉकडाऊन दरम्यान देखील वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी, रूग्णवाहिका यांनाही ट्रॅफिकमधे अडकावं लागतं. ही समस्या सोडवण्यासाठी आता मुंबईतल्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी कलर कोड आणण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे. जाणून घ्या कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता कलर कोड असेल.
15 दिवसांचा Lockdown नाही, महाराष्ट्राला 200 दिवसांच्या लसीकरणाची गरज
अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी एकूण तीन प्रकारचे कलर कोड असणार आहेत. ज्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्याप्रमाणे हे कलर कोड असणार आहे. कोणत्या सेवेसाठी कोणता कलर असेल ते जाणून घेऊयात.
लाल रंगाचं स्टिकर: हे आरोग्य सेवेतील कर्मचारी, रूग्णालयातील स्टाफ, मेडिकलशी उपकरणांची ने-आण करणारी वाहनं यांना लावण्यात येईल. तसंच औषधं वाहून नेणारी वाहनं, आरोग्य विषयक सेवांशी संबंधित वाहनं यांनाही हे स्टिकर लावण्यात येईल.
हिरव्या रंगाचं स्टिकर: हे भाजीपाला, फळं, बेकरीतले पदार्थ वाहून नेणारी वाहनं, डेअरी म्हणजेच दूध उत्पादनं वाहून नेणारी वाहनं या सगळ्यांना हिरव्या रंगाचं स्टिकर लावण्यात आलं.
पिवळ्या रंगाचं स्टिकर: हे खाद्यपदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना लावण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी अत्यावश्यक सेवांची वाहनं यांनाही हे पिवळ्या रंगाचं स्टिकर लावण्यात यावं असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्यामध्ये बॅकिंग क्षेत्रातली वाहनं, रेल्वे कर्मचाऱ्यांची वाहनं, इन्शुरन्स कंपन्यांची वाहनं, पत्रकारांना घेऊन जाणारी वाहनं यावर हे रंग लावण्यात यावीत अशीही सूचना देण्यात आली आहे.
सरकारने मनावर दगड ठेवून Lockdown केला आहे, लोकांना कळकळीची विनंती आहे की…
ही स्टिकर्स सहा इंच जाड असावीत आणि वाहनांना पुढच्या आणि मागच्या बाजूला दोन्ही ठिकाणी लावण्यात यावीत. आज संध्याकाळपासूनच ही कलर कोड पद्धत सुरू केली जावी असंही नगराळे यांनी स्पष्ट केलं. जर कुणी या स्टिकर्सचा गैरवापर केला तर मात्र त्या व्यक्तीला शिक्षा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT