मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यानंतर पुण्यातील (Pune) मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी या राज ठाकरेंच्या आदेशाचा विपरित भूमिका घेतली होती. ज्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरुन देखील हटविण्यात आलं होतं. यानंतर वसंत मोरे यांनी कालच (11 एप्रिल) राज ठाकरे यांची भेट घेतली. ज्यानंतर आपली नाराजी दूर झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण आता वसंत मोरेंचा कसा राजकीय गेम झाला याविषयी माजी मनसैनिक आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombre) यांनी आपलं मत मुंबई Tak सोबत बोलताना व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत रुपाली पाटील नेमकं काय म्हणाल्या..
‘जे वसंत मोरेंसोबत झालं तेच माझ्यासोबतही झालं’
‘सेम.. जे वसंत मोरेंसोबत झालं तेच माझ्यासोबत झालं होतं. आता होतं काय तेही ऐका.. की, वसंत मोरे यांनी जी भूमिका घेतली ही पक्षविरोधी नव्हती. ते त्यांनी त्यांचं मत मांडलं होतं. परंतु ती पुणे ते मुंबई जी साहेबांच्या शिवतीर्थापर्यंत वेगळ्या मार्गाने पोहचवली गेली.’
‘सगळ्यात महत्त्वाचं हे की, रिकामटेकडी, काम न करणारी लोकं आहेत ही राजसाहेब यांना सांगणार किंवा त्या व्यक्तीने चुकीचं केलेलं आहे हे सांगणार हे सतत चालू असतं, सतत…’
‘मी मनसेमध्ये 15 वर्ष काम केलं आहे. मागच्या डिसेंबरमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मनसे हा माझ्यासाठी विषय संपलेला आहे. म्हणजे 2017 साली भाजप स्वत: आम्हाला तिकीट देत होतं.’
‘त्या लाटेतही आम्ही मनसैनिक म्हणून स्वाभिमानाने काम करणारे आहोत म्हणून तिकीट नाकारलं. जेव्हा निवडणूक येते तेव्हा आमच्यावर संशय घेतला जातो. तेव्हा आमच्या कर्तृत्वावर संशय घेतला जातो.’ अशा शब्दात नाराजी व्यक्त करत रुपाली पाटलांनी मनसेवर टीका केली.
‘राज ठाकरे खाली सांगायचे पण फरक काहीच पडत नव्हता..’
‘आता वसंत मोरेंचा विषय तर मी नाही घडवून आणलेला. तो तुमच्या समोर घडलेला आहे. तो विषय माझ्या बाबतीत घडत होता. मी थेट राजीनामा दिला जय हिंद.. जय महाराष्ट्र केला. जिथे मला सन्मानाने काम करणाऱ्या, बहीण म्हणणाऱ्या, ताई म्हणणाऱ्यांना मागनं जर या सगळ्या गोष्टी करत असतील तर कशासाठी हा त्रास आम्ही सहन करायचा?’
‘इथे राज ठाकरेंचा विषयच येत नाही. कारण राज ठाकरेंकडे प्रश्न घेऊन गेल्यावर ते खाली सांगायचे, बोलायचे.. पण फरक काहीच पडत नाही. तीच पुन्हा वृत्ती वसंत मोरेंच्याबाबतीत झाली. वसंत मोरेंची नाराजी कदाचित दूर झाली असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.’
‘वसंत मोरे म्हणाले तसं.. त्या लोकांनी जे आहेत त्यांनी जरा आजूबाजूच्या प्रभागातील फक्त दोन ते तीन प्रभागाची जबाबदारी घेऊन लोकप्रतिनिधी निवडून आणावेत.’ असंही रुपाली पाटील यावेळी म्हणाल्या.
‘वसंत भाऊ तीन दिवस टीव्हीवर रडताना दिसले’
‘पक्ष सोडण्याचा निर्णय हा रुपाली पाटील-ठोंबरे हिचा स्वत:चा होता. तिने स्वाभिमानाने पक्ष सोडला. आज वसंत भाऊ तीन दिवस टीव्हीवर रडताना दिसतो. ही जी अवस्था केलीए ही योग्य आहे का? एक बहीण म्हणून मला वाईट वाटतं. तर पक्षाने त्यांची राजकीय हत्याच केली असं मी म्हणेन.’ अशी टीकाही रुपाली पाटलांनी केली आहे.
MNS: राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले ‘जय श्रीराम!’
‘राज ठाकरेंना भेटून वसंत मोरे शमले..’
‘मला जे काही पद मिळायचंय किंवा नाही मिळायचं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत पक्ष आहे. जसं वसंत मोरे हे राज ठाकरेंना भेटून शातं झाले, शमले.. जे विरोधात त्यांचं काही चाललं होतं ते शमले. त्यांना विचारणारे आम्ही कोण नाही आहोत की, तुम्ही का शमले?’ असा टोलाही यावेळी रुपाली पाटलांनी लगावाला आहे.
‘मनसैनिकांनी माझ्या पदाची काळजी करु नये’
‘आज लाखो मनसैनिक आहेत जे कोणत्याही पदाशिवाय मनसैनिक म्हणून मिरवत आहेत. मी पक्षामध्ये प्रवेश करताना अजित पवार म्हणाले की, ताई कर्तृत्ववान महिलेला आम्ही कधीही आमच्या पक्षात मागे ठेवत नाही. माझी जशी सुप्रिया बहीण आहे तशा तुम्ही माझ्या छोट्या बहीण आहात.’
‘हा जो एका कार्यकर्त्या महिलेला मिळालेला सन्मान आहे.. तर मी आधीच सांगते की, मला काय पदं मिळायचं आहे ती येत्या काळात तुम्हाला दिसतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता म्हणून आजन्म काम करेन.’
‘मनसैनिक माझ्या पदाची का काळजी करतायेत? मी तुमचं कुटुंब, तुमचं घर सोडलेलं आहे. तुमच्या घरातील बायकोला, बहिणींना, महिलांना काही नवं पद देता येईल का, त्यांच्याकडून काम करुन घेता येईल का? हा विचार करावा ना. म्हणजे बघा.. रुपाली पाटील सोडून गेली पचनी पडत नाही.’
‘माझी मनसैनिकांना विनंती आहे की, माझ्या पदाची कृपया काळजी करु नका. मी खूप खंबीर आहे. तसंच शरद पवार साहेब, सुप्रिया ताई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझी काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे तुमच्यासारख्या भावांची मला गरज नाही.’ असं म्हणत रुपाली पाटील यांनी मनसैनिकांनाच खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT