मनसेमधल्या अंतर्गत गटबाजीला वैतागून रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर आता आज अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT
रूपाली पाटील हे पुण्यातलं मनसेतलं मोठं नाव होतं. मनसेसाठी रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्ष सोडणं हा मोठा धक्का मानला जातो आहे. अशात रूपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरेंची 14 वर्षांची साथ का सोडली?
मनसेच्या रूपाली पाटील ठोंबरे, मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रूपाली पाटील यांच्यासह मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल मी आभारी आहे असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
रूपाली पाटील यांनी काय ट्विट केलं होतं?
‘आज शरद पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे हात नाहीत. तसंच पवारसाहेब नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत. हो म्हणूनच ठरलं आहे या वटवृक्षाच्या सावलीत, महाविकास आघाडीत स्थिरावणार.’ त्यांच्या या ट्विटमुळेच हे निश्चित झालं होतं की त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. ज्यानुसार त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.
माझ्याच पक्षातील अनेकांना माझं काम खटकत होतं. मी ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत होते ते मनसेतल्याच लोकांना बघवत नव्हतं. त्यामुळे मी तो पक्ष सोडला आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहे. लोकांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच सोडवणार आहे. यापुढे पुणे शहरात भव्य मेळावा घेणार आणि जे लोक आज पक्षात येऊ शकले नाहीत ते त्या मेळाव्यात प्रवेश घेतील हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी मनसेला दिला आहे.
मनसेत असताना सतत पालकमंत्री अजित पवारांची भेट का घेते, अशी विचारणा मला व्हायची. पालकमंत्री म्हणून अजित पवार खूप चांगलं काम करत आहेत. मी ज्या कामांसाठी आतापर्यंत अजित पवारांची भेट घेतली, ती सर्व कामे त्यांनी कायदेशीररित्या पूर्ण केली असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. तसंच ‘माझ्याच पूर्वीच्या पक्षातील म्हणजेच मनसेतील काही लोकांनाच मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते’ असंही त्या यावेळी म्हणाल्या.
ADVERTISEMENT