पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद रंगला होता. त्याच वादाची आठवण आता शिंदे-फडणवीस सरकारमध्येही झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना २४ तासांमध्ये स्थगिती देण्यात आली. त्यानंतर १२ तासात ९ अधिकाऱ्यांना पोस्टिंगही देण्यात आलं. गृहविभागाने केलेल्या बदल्यांना पोलीस महासंचालकांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे यामागे नेमकं कारण आहे तरी काय? ही चर्चा आता सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
१०० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बदल्या
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याने पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त वर्गात मोडणाऱ्या १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी त्यासंदर्भातले आदेश गृहखात्याने काढले होते. अशात राजकीय पातळीवर २४ तासांमध्ये काही सूत्रं हलली ज्यानंतर ९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाने स्थगिती दिली. यातली महत्त्वाची बाब ही आहे की ज्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली ते अधिकारी बहुतांश ठाणे आणि आसपासच्या भागातले आहेत. या ९ जणांना पोस्टिंगही देण्यात आलं. त्याची चर्चा आता रंगली आहे.
कुणाची कुठे झाली होती बदली?
ठाण्यातील परिमंडळ चार चे उपायुक्त प्रशांत मोहिते यांची ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे यांची नागपूरला झालेली बदली, ठाणे परिमंडळ-२चे उपायुक्त योगेश चव्हाण यांची नवी मुंबईत झालेली बदली, पालघरचे अप्पर अधीक्षक प्रकाश गायकडवाड यांची सोलापूरला झालेल्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. पुण्याच्या उपायुक्त नम्रता पाटील, फोर्स वनचे अधीक्षक संदीप डोईफोडे, राज्य सुरक्षा मंडळाचे समादेशक दीपक देवराज, कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायु्क्त शर्मिष्ठा घार्गे यांच्याही बदल्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या भागातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती?
ठाणे आणि पालघर हे दोन्ही जिल्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेले मानले जातात. या भागातल्या चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याने याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पूर्व कल्पना दिल नव्हती का? हा प्रश्न निर्माण व्हायला वाव आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अशाच प्रकारे दोनवेळा बदल्यांना स्थगिती
महाविकास आगाडी सरकारच्या काळात ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. आपल्याला विश्वासात न घेता काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे राष्ट्रवादीचं महत्त्व वाढतं आहे अशी तक्रार त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंकडे केली होती. ज्यानंतर या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात गृहविभागाने ३९ अधिकाऱ्यांची बदली केली होती. उद्धव ठाकरेंकडे याबाबत जेव्हा एकनाथ शिंदे यांनी दाद मागितली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. तर अनिल देशमुख हे जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा मुंबईतल्या १० उपायुक्तांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती.
ADVERTISEMENT