मुंबई: पाकिस्तानमधून परतलेल्या गीता हिला अखेर पाच वर्षांनी तिची खरी आई आणि तिचे कुटुंबीय सापडले आहेत. गीता ही एक मराठी कुटुंबातील मुलगी असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानमधून 2015 साली भारतात परतलेल्या गीताला अखेर तिची खरी आई सापडली आहे. खरं तर गीता ही मूक-बधिर तरुणी आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना शोधण्यात आजवर बऱ्याच अडचणी येत होत्या. पण पाकिस्तानात गीताचा सांभाळ ज्या सेवाभावी संघटनेने केला त्याच संस्थेने हा दावा केला आहे. गीताला तिची खरी आई आणि तिचं संपूर्ण कुटुंब हे महाराष्ट्रात सापडलं आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानाच्या ईधी वेल्फेअर ट्रस्टच्या बिलकिस ईधी यांनी दावा केला आहे की, गीता हिला तिचे खरे कुटुंबीय महाराष्ट्रात सापडले आहेत. बिलकिस यांनी याबाबत अशी माहिती दिली की, गीता ही माझ्या संपर्कात होती आणि याच आठवड्यात तिला तिची खरी आई सापडल्याची माहिती तिने मला दिली. बिलकिस यांच्या मते, गीता हिचं खरं नाव राधा वाघमारे असं असून ती महाराष्ट्रातील नायगावमधील मराठी कुटुंबातील मुलगी आहे.
दिवंगत पराराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अथक प्रयत्नामुळे चुकून पाकिस्तानात पोहचलेली गीता अनेक वर्षाने भारतात 2015 साली परतली होती. भारतात परतल्यापासून तिच्या खऱ्या कुटुंबीयांचा शोध सुरु होता. जो आता पूर्ण झाला आहे.
खरं तर गीता ही 11-12 वर्षांची असताना चुकून पाकिस्तानात गेली होती. ती पाकिस्तानच्या एका रेल्वे स्टेशनवर सापडली होती. त्यानंतर बिलकिस यांच्या संस्थेने कराचीमध्ये तिचा अनेक वर्ष सांभाळ केला. बिलकिस यांनी यावेळी असंही म्हटलं की, त्यांनी तिचं नाव फातिमा असं ठेवण्यात आलं होतं. पण जेव्हा ती हिंदू असल्याचं त्यांना समजलं तेव्हा त्यांनी तिचं नाव गीता असं ठेवलं. दरम्यान 2015 मध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने गीता भारतात परतली होती.
मात्र, असं असलं तरीही गीता आणि तिच्या आईचा डीएनए अद्याप झालेला नाही. सध्या गीता आणि तिचं जे कुटुंब सांगितलं जात आहे त्यातील काही जणांचे चेहरे जुळत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, डीएनए झाल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
2015 मध्ये भारतात आलेल्या गीताला आपलं खरं कुटुंब शोधण्यासाठी 5 वर्ष लागले आहेत. दरम्यान, अशीही माहिती मिळते आहे की, गीताच्या खऱ्या वडिलांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं होतं. सध्या या सगळ्याबाबत काहीसा संभ्रम आहे. त्यामुळे डीएनए टेस्ट झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.
ADVERTISEMENT