गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहराला पावसाने झोडपून काढलं आहे. या दोन दिवसांत पडलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शहरांत पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असून धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठावरील सर्वच मंदिर या पावसामुळे पाण्याखाली गेलेली असून नाशिक पोलीस, जिल्हा प्रशासनाचं बचाव पथक, आपत्ती निवारण कक्षाचे जवान कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी दक्ष आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून २३०० क्युसेस तर गंगापूर धरणातून ८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून ही 3 हजार क्यूसेस ने विसर्ग सुरू आहे. याचसोबत शहरातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी आलेलं आहे. दुतोंड्या मारुती पाण्याखाली बुडाला की नाशिकमध्ये पूर आला असं मानलं जातं. रामसेतू पुलाच्या नजीक पाणी पोहचल्यामुळे प्रशासनाने कोणताही अनुचित प्रसंग घडणार नाही याची तयारी केली आहे. गोदावरी नदीचं रौद्र रुप पाहून नाशिकररांना चिंतेत आहेत.
पावसाची ही संततधार कायम राहिल्यास नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पंचवटी, रामसेतू पूलानजिक असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती असते. हवामान विभागानेही पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवलेला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी करुन ठेवली आहे.
ADVERTISEMENT