गोंदिया जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कामठा बसस्थानकात नाकाबंदीदरम्यान केलेल्या कारवाईत साडेसात लाखांचा गांजा जप्त केला आहे. ३० जानेवारीला रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रावणवाडी-आमगाव मार्गावर गस्तीवर असताना रायपूर येथून गोंदिया येथे एमएच12/डी 1121 क्रमांकाच्या सेंट्रो कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कामठा बसस्थानकावर नाकाबंदी केली. दरम्यान मिळालेल्या वर्णनाची व क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता चार पोत्यांमध्ये भरलेला ५० किलो ७५० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. बाजारभावात या मालाची किंमत ७ लाख ६० हजारांच्या घरात असल्याचं कळतंय.
दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन याप्रकरणी वाहनचालक वाल्मिक लांजेवार व वाहनात त्याच्यासोबत असलेली महिला अनिता बनसोडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर एनडीपीसी कायद्याअंतर्गत कलम ८, २०, २९ अन्वये रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
ADVERTISEMENT