दरवर्षी ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी…’ असं म्हणत दिव्यांच्या सणाचं म्हणजेच दिवाळी आपण हर्षोल्हासात अन् मोठ्या आनंदाने स्वागत करतो. कडाक्याच्या थंडीला सुरूवात झालेली असते. अभ्यंगस्नान, दारातील आकाशकंदील आणि पणत्या यांनी सजलेलं घर… अशा अतिशय आनंददायी वातावरणात या प्रकाशमय सणाचं स्वागत केलं जातं. दिवाळी सणाची सुरुवात होते वसुबारसपासून… जाणून घेऊन वसुबारसबद्दल…
ADVERTISEMENT
गाईला आपल्या भारतात आणि विशेषतः हिंदू संस्कृतीत मोठं महत्त्वाचं स्थान आहे. गाईबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आहे. त्यामुळे ‘गोवत्स द्वादशी’ म्हणून हा दिवाळीचा पहिला दिवस ओळखला जातो आणि वसुबारसेने दिवाळीची सुरुवात होते. कार्तिक महिन्याच्या द्वादशीच्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण गुजरात आणि आंध्र प्रदेशात ‘वाघ बारस’ आणि देशाच्या इतर भागात ‘गुरु द्वादशी’ किंवा ‘गोवत्स द्वादशी’ म्हणूनही साजरा केला जातो.
या दिवशी दुधदुभत्या जनावरांची पूजा केली जाते. शेतीच्या कामात मदत करणाऱ्या या जनावरांना मनोभावे पूजण्याचे काम शेतकरी आणि घरातील लहानथोर करतात. मुख्यत्वे गाय आणि वासराची पूजा करण्याचा हा दिवस. या दिवशी गाय आणि वासराला गोडा धोडाचा नैवैद्य खाऊ घातला जातो. या दिवशी गावाकडे गोठे स्वच्छ करून सजवले जातात. काही ठिकाणी या दिवशी शेतात शेणाच्या गवळणी आणि श्रीकृष्णाची मुर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे. कुंकू, फुले वाहून गाय वासराची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत पशूधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. आपण पशूंवर अवलंबून असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
वसुबारस पूजेचा विधी
कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीच्या दिवशी सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात. ही पूजा प्रामुख्याने संध्याकाळी गोरज मुहूर्तावर केली जाते. तिन्ही सांजा एक झालेल्या असताना म्हणजेच यावेळी सूर्य पुर्णपणे मावळलेला नसतो. पूजेपूर्वी गाय आणि वासरांना सजवून त्यांना सजावट केलेले कपडे घातले जातात आणि फुलांचा हार घालण्यात येतो. कुंकू किंवा हळदीचा तिलक लावला जातो. काही ठिकाणी गाय आणि वासरू यांच्या मूर्तींची पूजा केली जाते. गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूगचा नैवद्य अर्पण केला जातो. भारतातील अनेक गावांमध्ये गाय उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी उपवास करतात.
वसुबारसचं माहात्म्य भविष्य पुराणात सांगितलेलं आहे. याला बछ बारसचं पर्व असंही म्हटलं जातं. हे पर्व नंदिनी व्रत म्हणूनही साजरं केलं जातं. कारण नंदिनी आणि नंदी (बैल) हे दोन्ही शैव धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. हा सण मुळात मानवांनी गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची संयुक्त पूजा केली जाते. पूजेदरम्यान त्यांना गव्हापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जातात.
गाईचं महत्त्व
आर्य संस्कृतीत गाईचं स्थान अग्रणी असून गोमातेला पृथ्वीचे प्रतीक मानले गेलं आहे. तिला ‘गावो विश्वस्य मातर:’ म्हणजे विश्वाची जननी मानलं गेलं आहे. आपल्या पूर्वजांना गाईचं वैज्ञानिक महत्त्व माहीत होतं व तिची उपयुक्तताही माहीत होती. गाईच्या संख्येवर ‘गोधन’ संपन्नता मोजली जात असे. एवढंच नव्हे तर अनेक तीर्थक्षेत्रांची नावे, गोत्रे, ऋषी, उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ, नद्या, पर्वत, इशविग्रह, सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारकासमूह, संपूर्ण विश्व, वनस्पती, धान्य एवढेच नव्हे तर अनेक उपकरणांची नावे ही ‘गो’ शब्दाच्या वेगवेगळ्या रूपाने अलंकृत आहेत. ऋषिमुनींनी संपूर्ण गोवंशाला देवत्व बहाल केलं व त्याला वंद्य, पूजनीय व अवध्य मानलं होतं. ऋग्वेदात गोसूक्ति म्हणून ज्या ऋचा आहेत त्यात गोमातेची महती, निरपराधित्व व उपयुक्तता सांगून गोघृताचे तर ‘अमृत’ असं वर्णन केलं आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला महत्त्व व अत्युच्च स्थान दिले गेलं आहे.
ADVERTISEMENT