आईस्क्रीम खाताना कॅफे मालकावर हल्ला, धडाधड गोळ्या घालून संपवलं, तपासातून उघड झालं धक्कादायक प्रकरण

Nagpur Crime : पोलीस उपायुक्त (DCP) राहुल माकणीकर यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली. 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत प्रतिस्पर्धी टोळीतील एका सदस्याला मारण्याची टोळीची योजना होती.

Mumbai Tak

मुंबई तक

29 Apr 2025 (अपडेटेड: 29 Apr 2025, 11:01 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये कॅफे मालकाची गोळ्या घालून हत्या

point

आईसस्क्रीम खात असताना 5 गोळ्या घातल्या

point

तपासात मोठं प्रकरण समोर, पाच जण ताब्यात

Nagpur Crime : नागपूर शहरात एका कॅफे मालकाची गोळ्या घालून हत्या झाली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी एका टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. अटक केलेले सर्व आरोपी हे नागपूरमधील हिरणवार टोळीतले असल्याची माहिती आहे. आरोपींनी 15 एप्रिल रोजी कॅफे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून ते फरार होते. पोलिसांनी मोठे प्रयत्न करुन आरोपींना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

कसा रचला होता कट? 

पोलीस उपायुक्त (DCP) राहुल माकणीकर यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली. 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत प्रतिस्पर्धी टोळीतील एका सदस्याला मारण्याची टोळीची योजना होती. पण त्यांना त्यात यश आलं नाही. त्याच वेळी, दुसऱ्या रात्री गोकुळपेठ परिसरातील भुसारी यांच्या कॅफेबाहेर या टोळीनं हल्ला केला. भुसारी त्यांच्या मॅनेजरसोबत आईस्क्रीम खात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं? 

आरोपींनी भुसारी यांना 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथकं तयार केली होती. भोपाळ, कोलकाता, विशाखापट्टणम, तिरुपती आणि गोंदियामध्ये संशयितांच्या शोधात अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टोळीतील सदस्य त्यांचे लोकेशन कळू नये म्हणून वारंवार मोबाईल फोन आणि सिम कार्ड बदलत होते. पण गुन्हे शाखेने काही आरोपींना नवेगाव धरण रेल्वे स्थानकातून आणि काहींना गोंदिया बस स्थानकातून अटक केली.

हे ही वाचा >> रिक्षा चालकाची मुलगी ते महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला IAS,अदिबा अहमदची मार्कलिस्ट पाहिली का?

दरम्यान, अटक केलेल्या आरोपींची ओळख शैलेश उर्फ ​​बंटी हिरणवार (31), अंकित हिरणवार (22), आदर्श उर्फ ​​गोट्या वाळके (20), शिब्बू राजेश यादव (20), रोहित उर्फ ​​भिक्कू मेश्राम (20) अशी झाली आहे. हे सर्व नागपूरमधील काचीपुरा येथील रहिवासी आहेत. तसंच, पोलीस अजूनही आणखी सहा आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, या टोळीनं हल्ल्यासाठी 1.2 लाख रुपयांना तीन पिस्तूल खरेदी केल्या होत्या.


    follow whatsapp