गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील ८ ते ९ जिल्ह्यांत पुराने थैमान घातलं आहे. कोकणात चिपळूण, खेड, महाड तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पुराने थैमान घातलं आहे. उप-मुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगलीतील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुराचा फटका बसलेल्या लोकांना तात्काळ मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पुराचं पाणी घरात आणि दुकानांमध्ये शिरुन अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अशा लोकांना तातडीने १० हजार आणि अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत विजय वडेट्टीवार यांनी महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली.
NCP चे आमदार-खासदार एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार, Ajit Pawar यांची घोषणा
याचसोबत पूरग्रस्तांना मदत करताना २०१९ सालच्या जीआरप्रमाणे मदत केली जाईल असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता.
पुरग्रस्त भागात अनेक घरांमध्ये खाण्या-पिण्याच्या गोष्टींसह सर्व संसार कोलमडून पडला आहे. अशा लोकांना आर्थिक मदतीशिवाय आणखी एका स्वरुपात मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून काल ६ जिल्ह्यांमध्ये पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ५ किलो तूरडाळ, ५ लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे.
ADVERTISEMENT