नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका वेगळ्याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. ‘भारतीय संसद मे भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करत असतानाच कोश्यारींनी राहुल गांधींविषयीचा एक किस्सा सांगितला. त्यात त्यांनी ते परिधान करीत असलेल्या काळ्या टोपीवरुन राहुल गांधी यांनी नेमकी काय टिप्पणी केली होती आणि आपण त्यांना कसं उत्तर दिलं होतं. हे सांगितलं.
ADVERTISEMENT
राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी दिल्लीत एका छोटोखानी समारंभात आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी कुमार चौबे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू हे देखील उपस्थित होते.
‘ही RSS ची काळी टोपी आहे’
भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ‘अनेक जण माझी काळी टोपी पाहून अशी प्रतिक्रिया देतात की, जसं एखादा बैल लाल कपडा पाहून वागतो तसं. मी जेव्हा खासदार होतो तेव्हा राहुल गांधींनी मला विचारलं होतं की, तुम्ही काळी टोपी का परिधान करतात?, मी त्यांना म्हटलं की, उत्तराखंडमधील लोक ही टोपी परिधान करतात. तेव्हा ते मला म्हणाले की, ‘नाही-नाही.. तुम्ही RSS चे आहात म्हणून ही टोपी परिधान करता. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, मी RSS सोबत जोडलेला आहे. पण टोपी उत्तराखंडमधील आहे. पण RSS च्या स्थापनेआधी उत्तराखंडमघील लोकं ही टोपी परिधान करत आलेले आहेत.’
‘सावरकर आरएसएसमध्ये होते असं राहुल गांधी म्हणतात’
कोश्यारी पुढे म्हणाले की, ‘काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा राहुल गांधींनी मला तोच प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, ही RSS ची टोपी नाही. याआधी देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यावेळी मी त्यांना विचारलं की, तुम्ही आरएसएसबद्दल काही वाचलं आहे का? तेव्हा ते म्हणाले की, हो.. मी सावरकरांबाबत वाचलं आहे.’
यावरुन कोश्यारी यांनी पुढे असंही सांगितलं की, ‘सावरकर हिंदू विचारसरणीचे होते, पण ते कधीही आरएसएसशी निगडीत नव्हते. यावरुन राहुल गांधींचं ज्ञान समजतं.’
‘भारतीय संसदेत भगतसिंग कोश्यारी’ या पुस्तकात याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून कोश्यारी यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. कोश्यारीच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण छायाचित्रेही या 450 पानांच्या पुस्तकात संकलित करण्यात आलं आहे.
या विशेष प्रसंगी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी संसदेच्या अधिवेशनात विरोधकांच्या वृत्तीवर टीका केली. तसेच संसदेत खासदार म्हणून भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेचे त्यांनी कौतुकही केले.
ADVERTISEMENT