महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. तळिये गावाला त्यांनी भेट दिली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार आहेत. दौरा राज्यपालांचा पण टीका मात्र आशिष शेलारांवर केली जाते आहे. सोशल मीडियात असा सूर आहे. आशिष शेलार यांचं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निलंबन करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपने उचलून धरला होता. त्यानंतर पीठासीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना त्यांच्या दालनात धक्काबुक्की झाली आणि शिवीगाळ झाल्याचेही आरोप झाले. या घटनेनंतर ज्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्यापैकी एक आशिष शेलार आहेत. जर कुणाला घेऊन जायचं होतं तर सरकारमधल्या एखाद्या व्यक्तीला का घेऊन गेले नाहीत राज्यपाल? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे.
ADVERTISEMENT
राजभवनाने राज्यपालांच्या दौऱ्याचा जो फोटो ट्विट केला त्यामध्ये आशिष शेलार दिसत नाहीत. त्यांचा फोटो नंतर समोर आला आहे. राज्यपालांनी दौऱ्यावर जात असताना आणि पूरग्रस्त भागांची माहिती आणि तेथील आढावा घेत असताना सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला घेऊन जाणं अपेक्षित होतं त्यांनी तसं का केलं नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?
राज्यपालांच्या दौऱ्याबाबत आणि त्यांच्यासोबत असलेल्या आशिष शेलारांबाबत जेव्हा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवार म्हणाले की, ‘राज्यपालांना ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना ते घेऊन गेले, शेलारांवर त्यांचा विश्वास असेल. राज्यपाल दौरा करत आहेत त्यातून ते केंद्राकडून मदत आणतील अशी अपेक्षा आहे.’ असं एका ओळीचं उत्तर देऊन शरद पवार यांनी आशिष शेलार यांच्यावर बोलणं टाळलं आहे.
जेव्हा पावसाळी अधिवेशनात बारा आमदारांचं भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ प्रकरणात निलंबन करण्यात आलं तेव्हा आशिष शेलार आणि इतर सर्व निलंबित बारा आमदार हे राज्यपालांना जाऊन भेटले होते. तसंच राज्यपालांना त्यांनी एक निवेदन देऊन झालेली कारवाई योग्य नाही असंही सांगितलं होतं. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली होती. मात्र बारा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे त्या निर्णयामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
अशी परिस्थिती असताना आणि राज्य कोरोनाशी लढा देत असतानाच महापुराचं संकट राज्यावर आलं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी 12 जिल्हे पूरग्रस्त झाले. तळये गावात तर आत्तापर्यंत 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत जेव्हा राज्यपाल हे या भागांचा दौरा करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी सरकारमधले पदावर असलेले अधिकारी किंवा मंत्री यांना या दौऱ्यावर घेऊन जाणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही. ते निलंबित आमदार आशिष शेलार यांना घेऊन गेले. नेमकी याच कारणामुळे राज्यपालांच्या दौऱ्यावरून आशिष शेलार यांच्यावर टीका केली जाते आहे.
ADVERTISEMENT