रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या आणि आज (मंगळवारी) निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक लक्षवेधी सामने रंगले होते. या लक्षवेधी सामन्यांमध्ये काहींना धक्कादायक तर काहींना दिलासा देणारे निकाल पाहायला मिळाले. असाचं आई विरुद्ध मुलगी असा लक्षवेधी सामना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीमध्ये रंगला होता. यात अखेरीस आईने मुलीचा पराभव करत विजयी पताका फडकवली आहे.
ADVERTISEMENT
गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गट विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी थेट लढत होती. या निवडणुकीत ठाकरे गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. सरपंच समित घाणेकर इथून निवडून आले आहेत.
पण या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये आई विरुद्ध मुलगी असा महत्त्वपूर्ण सामना रंगला होता. 70 वर्षाच्या आई सुवर्णा भोसले तर मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर या दोघी एकमेकांसमोर आल्या होत्या. आई ठाकरे गटातून तर मुलगी भाजप-शिंदे गटा प्रणित पॅनेलमधून निवडणूक लढवत होत्या. अखेरीस निकालात सुवर्णा भोसले यांनी प्राजक्ता देवकर यांचा जवळपास 50 मतांनी पराभव केला.
दरम्यान, या विजयाबद्दल बोलताना सुवर्णा भोसले म्हणाल्या, ज्या वेळी आपण प्रचाराला फिरत होतो त्यावेळेला मी कुठेही मुलीला मतदान करू नका असं सांगितलं नव्हतं. मी केवळं माझ्या पॅनलला मतदान करा असं सांगत होते. मी लोकांसाठी धावत होते, त्याचं फळ मला मिळालं. तसंच आमदार भास्कर जाधव आणि त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आमच्या गावात जी कामं केली त्यामुळे आम्हाला हे यश मिळालं असंही त्यांनी नमूद केलं. आपण निवडणुकीपूर्वी मुलीला सांगत होतो की “आता फॉर्म तू भरू नकोस पण तिने ऐकलं नाही अशीही खंत भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
ADVERTISEMENT