गेल्या वर्षानंतर या वर्षी देखील मुस्लिम बांधवांच्या रमजानवर कोरोनाचं सावट आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार पाहता सर्व धर्मिय सण तसंच उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येतायत. तर आता सध्याची परिस्थिती पाहता इतर सण-उत्सवांप्रमाणेच रमजान महिन्यासाठीही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवानी नियमित नमाज पठण, तराविह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साजरे करावे
सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करावा.
महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावं.
शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतू यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.
Break The Chain:राज्यात बुधवार रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांची संचारबंदी
रमजान महिन्यात बाजारामध्ये खरेदीकरीता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.
धार्मिक स्थळे बंद असल्याने सर्व कार्यक्रमांचे आयोजन सरकारच्या नियमांचे पालन करुन बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावं.
रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.
मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
ADVERTISEMENT