मुंबई : मुंबई आणि राज्याच्या जवळपास सर्वच भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान हवामान विभागने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकणसाठी पुढील ४८ तास मुसळधार पावसाचे असणार आहेत. तसेच आज (शुक्रवारी) सकाळी ९ वाजल्यापासून पुढील ४ तास मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये तीव्र पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
मुंबईच्या लोकल सेवेवर कोणताही परिणाम नाही :
दरम्यान, मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु, पावसामुळे रस्त्यांवरती अनेक ठिकाणी पाणी साठल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. याशिवाय पुढील ४८ तासांसाठी वाहतूक मंदावणे, झाडांची पडझड होण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय पुण्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट (24 तासांत 115.5 मिमी ते 204.4 मिमी ) देण्यात आला आहे. मागील 24 तासांत पुण्याच्या घाटमाथ्यावर लवासामध्ये सर्वाधिक 104 मिमी, लोणावळा 101.5 मिमी, गिरीवन 85 मिमी, निमगिरी 77 मिमी आणि माळीण 54.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तर पुणे जिल्ह्याच्या इतर भागासाठी ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरातील विविध भागात 24 तासांत (शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत) चिंचवड (23 मिमी), शिवाजीनगर आणि पाषाण (14.5 मिमी), वडगांव-शेरी (13 मिमी), कोरेगाव पार्क (11 मिमी) आणि मगरपट्टा (8 मिमी) असा पाऊस झाला.
ADVERTISEMENT