एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झाली ती योग्यच आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मलाही गुवाहाटीला जाण्याची ऑफर दिली गेली होती असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत संजय राऊत? (Sanjay Raut)
“आपला जो अंतरआत्मा असतो तो सांगतोय की मी काहीही केलेलं नाही. तपास यंत्रणांना सामोरं गेलं पाहिजे. दहा तास माझी चौकशी ईडीने केली. पण मी आत्मविश्वासाने या चौकशीला सामोरा गेलो होतो. गुवाहाटीला जाण्यासाठी मलाही ऑफर होती, पण मी गेलो नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेसोबत राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या आणि वागायचं असं. हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये पर वचन न जाये, हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी आणि हिंदुत्वाने शिकवलं आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
२१ जूनला राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आधी सुरत मग त्यानंतर गुवाहाटी गाठलं. गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेचे ३९ तर अपक्ष १२ असे ५१ आमदार त्यांच्या साथीला आले. मूळ शिवसेना आम्हीच आहोत हे सांगत या सगळ्यांनी बंड पुकारलं. तसंच भाजपसोबत जायला पाहिजे ही भूमिकाही घेतली. यानंतर जे अपेक्षित होतं तेच घडलं ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनाही टोला
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणताच येत नाहीये, माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री हे त्यांना सतत बोलत राहिलो. उप हा शब्द त्यांच्या नावापुढे उच्चारताना त्रास होतो. मात्र हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. जे मुख्यमंत्रिपदाच्या तयारीत होते त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा हे सांगितलं जातं. जे मुख्यमंत्री झालेत ते फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात ज्युनिअर होते असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे तसंच फडणवीस या दोघांनाही टोला लगावला.
शिंदे गटाकडून दिशाभूल केली जात आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. असं जर कोणी करत असेल, तर त्यांच्या मनात त्यांनी जो गुन्हा केलाय, त्याची खदखद आहे. आपण आपल्या नेत्याला फसवलं आहे, आपण शिवसैनिकांना फसवलं आहे, या खदखदीमुळे हे सर्व सुरु आहे. लोकांची दिशाभूल करणं ही भाजपची पद्धत. त्याच पद्धतीनं शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक वागत आहेत. राज्यातील जनता, लाखो कडवट शिवसैनिक दूधखुळे नाहीत. पण नवीन राज्य आलेलं आहे. नवीन विटी, नवीन दांडू त्यांनी त्यांचं काम करावं महाराष्ट्र, मुंबईसाठी. भाजपला जे हवंय, मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे. शिवसेनेची मुंबईतील ताकद नष्ट करायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवू दिली आहे. तुम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे, मुंबईवर शिवसेनेचा, बाळासाहेबांचाच झेंडा राहील असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT