नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी (17 फेब्रुवारी) दिल्लीतील सीमापुरी भागातील एका घराची झडती घेतली असता तेथे एक संशयास्पद बॅग सापडली. ज्यामध्ये IED बॉम्ब सापडल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे आता सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचवेळी एनएसजीही घटनास्थळी पोहचली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, स्पेशल सेलने ज्या घराची झडती घेतली, तेथे एका बॅगेत संशयास्पद वस्तूंचे सीलबंद पॅक आढळून आले. तपासणीनंतर त्यामध्ये IED बॉम्ब आढळून आला. ज्याला आता NSG टीम ओपन पार्कमध्ये घेऊन जाणार असून जिथे तो नष्ट केला जाईल.
ज्या खोलीतून बॅग सापडली त्या खोलीत 3-4 मुले भाड्याने राहत असल्याचे सांगितले जात आहे. जे सध्या फरार आहेत. दिल्लीच्या गाझीपूरमध्ये RDX प्रकरणाचा तपास करत असताना स्पेशल सेलची टीम दिल्लीच्या सीमापुरी भागातील घरी पोहोचली.
याच ठिकाणी त्यांना ही संशयास्पद बॅग सापडली. यावेळी बॅगेत असलेले सीलबंद संशयास्पद वस्तू त्या बॅगेतून वेगळे करून दुसऱ्या बॅगेत टाकण्यात आले. तपासादरम्यान त्यात IED बॉम्ब असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून दहशतवादी हे पुन्हा एखादा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळेच यंत्रणा अधिक सावध झाल्या आहेत.
घर मालकाची चौकशी सुरु
ज्या घरातून IED जप्त करण्यात आला ते घर कासिम नावाच्या व्यक्तीचे आहे. ज्याने काही दिवसांपूर्वी प्रॉपर्टी डीलर शकीलच्या माध्यमातून आपल्या घराचा दुसरा मजला एका मुलाला भाड्याने दिला होता. त्याचवेळी 10 दिवसांपूर्वी आणखी 3 तरुण त्याच्यासोबत येथे राहायला आले होते. पण पोलीस येण्यापूर्वीच सर्व तरुण खोलीत IED बॉम्ब असलेली बॅग सोडून पळून गेले होते. त्यामुळे आता त्याच प्रकरणी घरमालकाची चौकशी सुरू आहे.
मागील महिन्यातही सापडला होता IED बॉम्ब
यापूर्वी, अलीकडेच दिल्लीतील गाझीपूर फूल मंडीच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर एक IED बॉम्ब सापडला होता. जो निष्क्रिय करण्यात आला होता. पण मागील काही दिवसांपासून दहशतवादी हे दिल्लीत मोठा स्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील संपूर्ण परिसराची रेकी करण्यात आली होती आणि प्रत्येक माहिती गोळा करून हा हल्ला करण्याची तयारी करण्यात आली होती.
दिल्लीतल्या इस्रायली दुतावासाजवळ स्फोट
दिल्ली पोलिसांना 14 जानेवारी रोजी सकाळी 10.20 वाजता पीसीआर कॉल आला होता. गाझीपूर परिसरात एक संशयास्पद बॅग असून त्यात बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले होते. माहिती मिळताच, परिसरातील पोलीस आणि स्पेशल सेलचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर एनएसजीची टीम आणि बॉम्ब निकामी करणारे पथकही येथे पोहोचले होते. तपासादरम्यान बॅगेत IED असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून बॉम्ब त्यात निकामी करण्यात आला होता.
ADVERTISEMENT