स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
लोकशाही जीवन पद्धतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संघटना करण्याचं स्वातंत्र्य आणखी दहा प्रकारची स्वातंत्र्य असतील. महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य उपभोगलं आहे. गुरूवारी एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकलं आहे. काय कारण असेल ते भगवंताला ठाऊक, पण सांगितलं जातं की विकास, सुधारणा आणि प्रगतीसाठी राज्याची अर्थसत्ता बलवान पाहिजे. त्यामुळे ज्यातून महसूल खूप मिळतो असं सुधारणेचं पाऊल महाराष्ट्र शासनाने टाकून फार मोठं प्रगतीचं काम केलं आहे. ते काम भविष्यात या देशाला पशूपण देणारं आहे. राष्ट्राला राष्ट्र म्हणून टीकण्यासाठी काही उदात्त, पवित्र विचारांचं आणि आचारांचं अधिष्ठान असावं लागतं. अशा शब्दात वाईन किराणा मालाच्या दुकानात मिळण्याच्या निर्णयावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खोचक टीका केली आहे.
एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल प्रगतीच्या दिशेने असलं पाहिजे. मात्र महाराष्ट्र सरकारचा निर्णय म्हणजे सर्वनाशाकडे पडलेलं पाऊल आहे असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दारूबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावरून घणाघाती टीका केली. या देशातली दारू संपली पाहिजे. दारूला अशा प्रकारे संमती देत असाल तर गांजाची शेती करायलाही अडवू नका असाही खोच सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. अफू, गांजा याचीही शेती करून आपला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारात पैसा मिळवू शकेल असंही हरकत नाही म्हणणारा बेशरम समाज उत्पन्न होतो आहे अशीही टीका त्यांनी केली.
राज्यातल्या सुपरमार्केटमध्ये मिळणार वाईन, राज्य सरकारची परवानगी
भगवान श्रीकृष्णाने कौरवांना सांगितलं होतं थोडी काही सद्बुद्धी असेल तर पाहा. युद्ध टाळा. त्यावेळी सुयोधन नावाची व्यक्ती याबाजूला येऊन उभी राहिली. आपल्या मंत्रिमंडळात कुणीही सुयोधन नाही याचं दुःख वाटतं. मला आठवण होते ती आर आर पाटील यांची. डान्स बार त्यांनी बंद केले. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंद केले आज तर आबा असते तर त्यांनी हा घातकी आणि नीच, देहांताचा प्रायश्चित ज्यांच्या गुन्ह्याला असावं असा निर्णय झाला नसता. असे निर्णय झाल्यानंतर अनेक प्रकारच्या संघटना आहेत. राग येत नाही. हिंदू रक्ताला राग येत नाही. चीनने आपली जमीन बळकावली तरीही चायनीज फूड खालच्या वरच्या तोंडाने खाणारा समाज जिवंत आहे. तसंच या निर्णयाचाही राग हिंदू समाजाला येईल असं वाटत नाही. ज्यांनी जगाला विचार दिला त्या ज्ञानोबा-तुकोबांचा विचार काय सांगतो हे तरी या सरकारने विचारात घ्यायला हवं होतं. वारकरी समाजानेही विचार केला पाहिजे की या निर्णयाविरोधात आपण काय करणार. आरक्षणासाठी हपापलेल्या जातीच्या संस्था आहेत. त्यांनीही याविरोधात पेटून उठलं पाहिजे. ते या विरोधात गेले नाहीत तर भारतमातेची कूस बाटवली आहे असं त्यांनी समजावं असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT