माझ्या जुहू येथील बंगल्याला नोटीस पाठवण्यात आल्याच्या बातम्या आल्या आहेत. या नोटीसमध्ये कारवाईसंदर्भात काहीही लिहिलेलं नाही. या नोटीसमध्ये बंगल्याचं मोजमाप घ्यायचं आहे आपण संमती द्यावी असं म्हटलं आहे असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मातोश्री २ चं बेकायदा काम पैसे देऊन कायदेशीर करण्यात आलं आहे असाही आरोप नारायण राणेंनी केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत नारायण राणे?
जवळपास १३-१४ वर्ष मी या घरात येऊन झाली आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट तलाठी आहेत. जगभरात त्यांचं नाव आहे. नामांकित आर्किटेक्टनी ही इमारत बांधली आहे. ती बांधल्यानंतर १९९१च्या डीसी नियमाप्रमाणे ती बांधली. ताबा देण्यात आला. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बीसीसी या दोन्ही गोष्टी पालिकेने दिल्या होत्या. एकही गोष्ट अपूर्ण न ठेवता १०० टक्के कायदेशीर काम मी केलं आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम मी केलेलं नाही.
या घरात माझी पत्नी, मी, दोन मुलं आणि त्यांचे दोन छोटे असे आठ लोकं आम्ही राहातो. इथे कोणत्याही प्रकारे हॉटेलिंग वगैरे चालत नाही. १०० टक्के रेसिडेन्शियल इमारत आहे. आजूबाजूच्यांनाही विचारा. असं असतानाही शिवसेनेकडून, मातोश्रीकडून नोटीस लावण्याचं काम केलं गेलं. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने २०१५-१६-१७ साली तक्रारी करायच्या, पालिकेकडून सगळे प्लॅन बघितले जायचे आणि काही अवैध नाही असं म्हणून उत्तर पाठवायचे. मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम पैसे देऊन रेग्युलर करण्यात आलं आहे आम्ही काही बोललो का? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे.
दिशा सालियनबाबत काय म्हणाले नारायण राणे?
दिशा सालियनची ८ जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली. दिशा सालियनला त्या पार्टीला जाण्याची इच्छा नव्हती. तिचा पोस्टपॉर्टेम रिपोर्ट का आलेला नाही? दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची त्या इमारतीतल्या रजिस्ट्ररचं ८ जूनचं पान का फाडण्यात आलं? असे प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केले आहेत. दिशा सालियन सोबत जे काही घडलं ते सुशांतला समजलं होतं. त्याच्यासोबत काही लोकांचा वाद झाला त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आणि आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं असाही आरोप नारायण राणेंनी केला.
सुशांत सिंगच्या घरात कोण गेलं होतं? सुशांत सिंगच्या इमारतीतले सीसीटीव्ही कोणी गायब केले? तरूण कलाकाराची हत्या कुणी केली? कोणत्या मंत्र्याची गाडी तेव्हा उभी होती? विशिष्ट अँब्युलन्स कशी आली? सगळे पुरावे कुणी नष्ट केले? असे सगळे प्रश्न नारायण राणेंनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT