पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली. शौचालयाची टाकी साफ करत असताना वाचवण्याच्या प्रयत्नात टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत ग्रामपंचायत सदस्यासह चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
मृतांमध्ये दादा पोपट कसबे (वय 45), पद्माकर मारुती वाघमारे (वय 43), कृष्णा दत्ता जाधव (वय 26, रा. देगाव ता. उत्तर सोलापूर सोलापूर) आणि रूपचंद उर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे (वय 45 रा. घोरपडे वस्ती कदम वाक वस्ती मुळगाव केळेवाडी-ता. वाशी. जिल्हा उस्मानाबाद) या चौघांचा समावेश आहे.
लोणी काळभोर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात कदमवाक वस्ती जवळ असलेल्या त्याचा हॉटेलच्या पाठीमागे जय मल्हार कृपा सोसायटीमध्ये शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम सुवर्ण कांबळे व यश दादा कसबे यांना दिले होते.
बुधवारी सकाळी टाकीची स्वच्छता करत असताना चौघांपैकी कृष्णा जाधव शौचालयाच्या टाकीत पाईप सरकवत असताना तोल जाऊन पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दादा कसबे देखील टाकीत पडले. या दोघांना वाचण्यासाठी सुवर्ण कांबळे हे टाकीत उतरले.
पंधरा मिनिटाहून अधिक काळ टाकीतून कोणीच बाहेर येत नसल्याचे पाहून टाकीच्या शेजारच्या खोलीत राहणारे भाडेकरू पद्माकर वाघमारे यांनीही टाकीकडे धाव घेतली आणि ते देखील या टाकीमध्ये पडले. टाकीत मोठ्या प्रमाणावर घाण आणि जास्त असल्याने गुदमरून या चौघांचा देखील या घटनेत मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाघोली फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या चौघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनेबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी अधिक तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT