कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी लाट अशा तिन्ही लाटा देशाने अनुभवल्या. लॉकडाऊन ते हळूहळू निर्बंध शिथील होणं या सगळ्या प्रक्रियाही गेल्या दोन वर्षात देशाने अनुभवल्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2022 पासून म्हणजेच येत्या गुरूवारपासून देश कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ADVERTISEMENT
देशात दोन वर्षांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला आणि अक्षरशः थैमान घातलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. कठोर लॉकडाऊनचीही अंमलबजावणी करण्यात आली होती. आता 31 मार्च 2022 पासून म्हणजेच तब्बल दोन वर्षांनी हे निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. कोरोना रूग्णांच्या देशातल्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे त्याचमुळे केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
महाराष्ट्रात मास्क मुक्तीचा निर्णय झालाय का? अजित पवारांनी थेट दिलं उत्तर, म्हणाले…
मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक
केंद्र सरकारने निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला असला तरीही मास्कची सक्ती काय असणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात यावं असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मास्कमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याला मदत होते. तसंच सोशल डिस्टन्सिंगमुळेही त्यात भर पडते त्यामुळे इतर नियम शिथील केले तरीही हे दोन नियम मात्र कायम राहणार आहेत असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
2020 मध्ये 21 मार्चला देशभरात 24 तासांसाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर तीन दिवसातच म्हणजेच 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन आणि इतर कठोर निर्बंध जारी करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि प्रसार होऊ नये म्हणून हे निर्बंध लादण्यात आले होते. आता या निर्बंधातून देश मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनाच्या या निर्बंधांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत होते. काही निर्बंधांमधून शिथीलताही देण्यात आली होती मात्र पूर्णपणे निर्बंध संपले नव्हते. आता मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत जी वाढती घट होते आहे ती पाहून केंद्र सरकारने सगळे निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. रूग्ण निदान, रूग्णशोध, उपचार, लसीकरणावर भर या सगळ्या बाबतीत देशाने चांगलं काम केल्याचं यामध्ये म्हटलं आहे. देशात सध्याच्या घडीला सक्रिय रूग्णांची संख्या 20 हजारांवर आली आहे. तर कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दरही 0.28 टक्के इतका खाली आला आहे. या महत्त्वाच्या कारणांमुळे आणि लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने आपण निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतल्याचं भल्ला यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
ADVERTISEMENT