रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाची झळ अखेरीस भारताला बसली आहे. खार्किव्हमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईदरम्यान कर्नाटकच्या नवीन या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भारतीय दुतावासातील लोकं खार्किव्हमधील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाहीयेत असा आरोप नवीनच्या वडीलांनी केला आहे.
ADVERTISEMENT
लष्करी कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नवीन खार्किव्हमध्ये एका बंकरमध्ये लपला होता. परंतू जवळ खाण्याचे पदार्थ नसल्यामुळे तो बाहेर वस्तू आणण्यासाठी गेला असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नवीनच्या बाबांनी दिली आहे. ते पीटीआयशी बोलत होते. नवीन शेखरगौडा हा कर्नाटकच्या चालगेरी भागात राहणारा होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर परिवारासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध : नको होतं तेच घडलं! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
नवीनच्या वडीलांनी यावेळी आरोप करत भारतीय दुतावासातील लोकं खार्किव्हमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचं मह्टलं आहे. नवीन मेडीकलच्या चौथ्या वर्षात खार्किव्हमध्ये शिकत होता. गुरुवारीच नवीनची त्याच्या वडीलांसोबत फोनवरुन चर्चा झाली. यावेळी त्याने बंकरमध्ये खाण्याचे पदार्थ संपत आल्याचं सांगितलं होतं. नवीनने युद्धभूमीत अडकलेला असतानाही आपल्याबद्दल घरच्यांना माहिती देणं थांबवलं नव्हतं. तो दिवसांतून दोन ते तीन वेळा घरी फोन करुन आपली ख्यालीखुशाली कळवायचा.
नवीनच्या मृत्यूची बातमी समजताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याच्या परिवाराशी संपर्क साधत त्यांना धीर दिला आहे. नवीनचा मृतदेह कर्नाटकात आणण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल असं आश्वासन बोम्मई यांनी दिलं. याचसाठी आपण परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कात असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नवीनच्या वडीलांशी फोनवरुन संपर्क साधत त्यांना धीर दिला आहे.
युद्धभूमीतला संघर्ष जेव्हा आईच्या मिठीत संपतो
ADVERTISEMENT