हर्षदा परब: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीत जुन्या मृत्यूंची नोंद करण्यात येते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुमारे 17 हजार 724 जुने मृत्यू कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत समाविष्ट करण्यात आले आहेत. मग राज्य सरकारकडून कोरोना रुग्णांची आकडेवारी लपविण्यात येतेय का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला.
ADVERTISEMENT
रविवारी 13 जूनला एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या कोरोना मृत्यूंच्या संख्येमध्ये तब्बल 2771 मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 2288 मृत्यू एवढे जुने मृत्यू होते. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मागचे किंवा जुने मृत्यू का राज्याच्या आकडेवारीत सामिल केले? हा राज्यातल्या मृत्यूची संख्या लपवण्याचा प्रयत्न आहे का? का असे मृत्यू उशीराने समोर येताहेत. अशा त-हेने उशीराने हे मृत्यू कोरोनाच्या राज्याच्या आकडेवारीमध्ये का सामिल केले जाताहेत? मृत्यू वेळीच न नोंदवण्यामागे नेमकं कारण काय?
रविवारी 13 जूनला कोरोनाचे सर्वाधिक जुने मृत्यू नोंदवले गेलेत. रविवारी नोंदवलेल्या एकूण 2771 मृत्यूंपैकी 284 मृत्यू हे मागच्या 48 तासात झालेले आहेत. तर,199 मृत्यू हे मागच्या आठवड्यातले तर 2288 मृत्यू हे 1 आठवड्यापेक्षा जुने होते. राज्यातल्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत सामिल केलेल्या 2288 जुन्या मृत्यूंपैकी सर्वाधिक जुने मृत्यू हे नाशिकमधले आहेत.
नाशिकमध्ये 467
नागपूरमध्ये 351
पुणे 324
अहमदनगर 249
सातारा 148
असे जुने मृत्यू राज्याच्या कोरोनाच्या मृत्यूच्या आकडेवारीत सामिल करण्यात आले आहेत.
ज्यात मुंबईतील आरोग्य यंत्रणेने डाटा मध्ये गोंधळ नसल्याचा दावा केला होता. तिथेही 67 जुने मृत्यू नोंदवले गेले आहेत.
17 मे पासून 17 हजार 724 जुने मृत्यू राज्याच्या मृत्यूच्या आकडेवारीत सामिल करण्यात आले आहेत. तर मागच्या 28 दिवसात अशा त-हेने 11 हजार 894 कोरोनाचे जुने मृत्यू राज्यातील मृत्यूच्या आकडेवारीत सामिल करण्यात आले आहेत.
उशीराने समोर आलेली ही माहिती मग राज्याच्या आकडेवारीमध्ये समाविष्ट करण्यात येते. ज्याला इंग्रजीत रिकॉन्सिलिएशन असं म्हणतात तर मराठीत त्याला ताळमेळ प्रक्रिया असं म्हटलं जातं.
ही रिकन्सिलिएशन किंवा ताळमेळ प्रक्रिया काय आहे?
आई सी एम आर चे सी. व्ही. अनालिटिक्स पोर्टल ज्यावर बाधित रुग्णांच्या माहितीसाठी नोंद केली जाते. तर कोविड १९ पोर्टल मृत्यूच्या माहिती नोंदवली जाते. या शिवाय प्रयोगशाळांसाठी आर टी पी सी आर ॲप आणि रुग्णालयांसाठी फॅसिलिटी ॲप वापरण्यात येते. साधारणपणे दर पंधरा दिवसांनी अनालिटिक्स आणि कोव्हिड अशा दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्याचा कोरोना अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते.
ही माहिती यायला उशीरा का होतो याची तांत्रिक कारणंही आहेत.
माहिती उशीरा का येते याची तांत्रिक कारणं पुढील प्रमाणे
– प्रत्येक हॉस्पिटलने त्यांच्याकडील रुग्णांची माहिती वेळेवर भरावी अद्ययावत करावी यासाठी प्रत्येक रूग्णालयाला फॅसिलिटी ॲप ही ऑनलाईन सेवा पुरवण्यात आलेली आहे.
– पण अनेक रुग्णालये, विशेषतः खाजगी रुग्णालये या फॅसिलिटी ॲपवर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती वेळीच भरत नाहीत. त्यामुळे किती रुग्ण बरे होऊन घरी गेले किंवा किती जणांचा मृत्यू झाला याबाबत रियल टाइम डेटा मिळण्यामध्ये अडचणी येतात.
– हॉस्पिटलमधून माहितीला उशीर झाला की जिल्हास्तरावर ही माहिती संकलित करून ती कोविड पोर्टलवर अपलोड केली जाते. पण या प्रक्रियेमध्ये अनेकदा बराच वेळ लागतो. यामुळे काही मृत्यूची माहिती बरीच उशीर उपलब्ध होते.
– आयसीएमआर पोर्टल वर प्रयोगशाळा आपली माहिती भरतात. परंतु अनेकदा प्रयोगशाळेकडील तपासलेल्या नमुन्यांची सर्व माहिती वेळेवर भरली जात नाही. तपासलेल्या नमुन्याबाबत माहिती मागे राहिली तर ते पॉझिटिव्ह रुग्ण पोर्टलवर दिसत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांच्या डिस्चार्ज किंवा मृत्यू बद्दलची माहिती देखील वेळेत भरण्यामध्ये अडचणी येतात.
– दोन पोर्टल मधील माहिती एकत्रित होण्यासाठी लागणारा वेळ (Synchronization) आणि इतर तांत्रिक कारणामुळे देखील माहितीमध्ये तफावत आढळते.
– राज्यामध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये रुग्णांची संख्या खूप जास्त होती. या कालावधीत जिल्ह्यांची सर्व यंत्रणा रूग्ण व्यवस्थापन, खाटांचे व्यवस्थापन ऑक्सिजन आणि औषध पुरवठा या बाबींमध्ये व्यस्त असल्यामुळे या काळातील नोंदी या राहून गेल्या. त्याची माहिती आता जिल्हा आणि रुग्णालय स्तरावरून अपडेट करण्यात येतेय
अशा त-हेने जुने मृत्यू कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत नोंदवण्याची अशी तांत्रिक कारणं आरोग्या विभागाने दिलेल्या खुलाशामध्ये सांगितली आहेत.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर बिहार, मध्य प्रदेश, गोवा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जुने मृत्यू नोंदवले गेल्याचं समोर आलंय.
असे हे मागचे, जुने कोरोना मृत्यू राज्याच्या आकडेवारीमध्ये नमूद केल्यामुळे आता राज्यात 1 लाख 11 हजार 104 मृत्यूंची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT