Jahangirpuri Violence : बिकरूतून निघालेला जेसीबी कसा पोहोचला जहांगीरपुरीपर्यंत?

मुंबई तक

• 11:27 AM • 20 Apr 2022

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजावाजा झालेला बुलडोजर आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरीत अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्यात आला. अनेक घरं पाडण्यात आली. या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचं बुलडोजर मॉडेल इतर राज्यांतही चर्चेत आलं आहे. बुलडोजर कारवाईची चर्चा सुरू झाली ती २०२१ मध्ये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]

Mumbaitak
follow google news

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजावाजा झालेला बुलडोजर आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरीत अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्यात आला. अनेक घरं पाडण्यात आली. या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचं बुलडोजर मॉडेल इतर राज्यांतही चर्चेत आलं आहे.

हे वाचलं का?

बुलडोजर कारवाईची चर्चा सुरू झाली ती २०२१ मध्ये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं हे बुलडोजर मॉडेल आता दुसऱ्या राज्यांतही पोहोचलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तर योगी आदित्यनाथ यांनाच ‘बुलडोजर बाबा’ असं संबोधलं गेलं. हे नाव दिलं ते समाजवादी पार्टी नेते अखिलेश यादव यांनी. आता योगींचं हे मॉडेल मध्य प्रदेश मार्गे दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे.

योगी सरकारच्या काळात जेसीबीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर जेसीबीखाली सायकली चिरडल्याचे प्रकारही घडले. आता हेच बुलडोजर मॉडेल इतर राज्यांमध्येही पसरताना दिसत आहे.

दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात थेट बुलडोजर चालवला जाताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातून बुलडोजर मध्य प्रदेशातील खरगोनपर्यंत पोहोचलं. त्यानंतर गुजरातमधील खंभात, उत्तराखंड आणि आता दिल्लीत पोहोचलं आहे.

२०१७ मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. त्यानंतर बुलडोजर चर्चेत यायला सुरूवात झाली. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगार आणि माफियांच्या घरांवर बुलडोजर चालवले.

जुलै २०२० मध्ये कानपूरमधील बिकरू येथे विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. यात ८ पोलीस मारले गेले. या घटनेनंतर विकास दुबे फरार झाला. त्यानंतर प्रशासनाने विकास दुबेच्या घरावर बुलडोजर चालवला. तेव्हापासूनच उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या अवैध संपत्तीवर बुलडोजर कारवाईची सुरूवात झाल्याचं सांगितलं जातं.

रिपोर्ट्सनुसार उत्तर प्रदेशात योगी सरकारने दोन डझनाहून अधिक माफियांच्या घरांवर बुलडोजर चालवला. त्याचबरोबर १५०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. फेब्रुवारी २०२१ मध्ये सरकारने विधान परिषदेत दिलेल्या माहितीप्रमाणे २०१७ मध्ये भाजप सरकार आल्यानंतर ६७ हजार एकर जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली.

या ‘बुलडोजर मॉडेल’ने योगी आदित्यनाथ यांना पुढे ‘बुलडोजर बाबा’ बनवलं. जानेवारीमध्ये प्रचाराच्या दरम्यान अखिलेश यादव यांनी योगींना हे नाव दिलं होतं. “जे ठिकाणांची नावं बदलतात, आज वर्तमानपत्रांनीच त्यांचं नाव बदललं आहे. वृत्तपत्र गावांपर्यंत पोहोचले नसतील, त्यामुळे मी सांगतो. त्यांचं नाव बदलून बुलडोजर बाबा ठेवण्यात आलं आहे.”

काही दिवसांपूर्वी प्रतापगडमध्ये रेल्वे स्थानकावर शौचालयात कार्यरत असलेल्या एकाने महिलेसोबत गैरकृत्य केलं. आरोपी फरार झाला. त्यामुळे पोलीस थेट आरोपीच्या घरी बुलडोजर घेऊन पोहोचले. पोलीसांच्या या पावित्र्यामुळे आरोपीने स्वतःहून पोलिसांत हजर झाला.

‘बुलडोजर बाबा’नंतर ‘बुलडोजर मामा’

उत्तर प्रदेशनंतर बुलडोजर चर्चेत आलं ते मध्य प्रदेशात. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपींची घरं बुलडोजरने पाडण्यात आली. एका आरोपीचं पिकही बुलडोजरने उद्ध्वस्त केलं. त्यानंतर सिवनीतील कुरईतही आरोपींचं घर बुलडोजर लावून जमीनदोस्त करण्यात आलं.

या कारवायांनंतर भोपाळमधील भाजपचे आमदार रामेश्वर शर्माने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना बुलडोजर मामा असं नाव दिलं. ‘मुलीच्या सुरक्षेत जो बनेल अडथळा, मामाचं बुलडोजर बनेल हातोडा,’ अशा आशयाचं बॅनर त्यांनी लावलं होतं.

यानंतर १० एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी खरगोनमध्ये हिंसाचार उसळला. रामनवमीच्या शोभायात्रेवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे हिंसाचार उसळला. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने आरोपींची घरं बुलडोजरने जमीनदोस्त केली. यावरून मध्य प्रदेशातील राजकारण पेटलं होतं.

मध्य प्रदेशनंतर गुजरामध्येही अशाच पद्धतीने आरोपींविरुद्ध बुलडोजर मॉडेल वापरलं गेलं. गुजरातमधील खंभातमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसाचार घडला. त्यानंतर पोलिसांनी हिंसाचारामागे परदेशातील व्यक्तींचा हात असल्याचा दावा केला होता.

या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खंभातमध्ये अतिक्रमणांवर बुलडोजर चालवला गेला. अवैध दुकानं, घरं आणि रस्त्यांच्या आजूबाजूला असलेल्या झोपड्यांवर बुलडोजर चालवला गेला. आरोपींच्या अवैध अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला.

उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत आली. त्यानंतर सरकारने अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्याची मोहीम हाती घेतली. हनुमान जयंती दिनी जलालपूर येथे शोभयात्रेवर दगडफेक झाली होती. प्रशासनाने आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालवला.

बिहारमध्येही अवैध बांधकामांवर बुलडोजर चालवला गेला. २५ मार्च २०२१ रोजी सोनू राय हत्या प्रकरणातील आरोपींच्या घरांवर छपरा प्रशासनाकडून बुलडोजर चालवला गेला. या हत्या प्रकरणात पाच आरोपींचा समावेश होता, ज्यापैकी दोघांना अटक करण्यात आलं होतं. न्यायालयाने तीन आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. पण प्रशासनाने संपत्ती जप्त करण्याबरोबरच बुलडोजरही चालवला.

बुलडोजर पोहोचला जहांगीरपूरपर्यंत …

उत्तर प्रदेशपासून सुरू झालेलं हे बुलडोजर मॉडेल आता दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. जहांगीरपूर येथे हनुमान जयंती दिनी हिंसक घटना घडली. या हिंसाचारानंतर आता अतिक्रमण केलेल्या घरं, दुकानांवर बुलडोजर चालवला गेला. बुधवारी सकाळीच ही मोहीम हाती घेण्यात आली होती. १५०० जवानांच्या सुरक्षेत ही कारवाई केली गेली. त्यानंतर या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

    follow whatsapp