कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये चक्क तंबाखू मळण्यावरुन राडा झाल्याचं समोर येतंय. एक कैदी तंबाखू मळत असताना दुसऱ्या कैद्याने त्याला प्रतिबंध केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. ज्यात तंबाखू खाणाऱ्या कैद्याने दुसऱ्या कैद्याला बेदम मारहाण केली.
ADVERTISEMENT
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी संतोष साळुंखे या कैद्यावर गुन्हा दाखल केला आहे. संतोषने दानिश उर्फ मेंटल उमर इंजिनीअर या कैद्याला मारहाण केली ज्यात तो जखमी झाला आहे. दानिश हा अंबरनाथ शहरात राहणारा असून तो एका गुन्ह्यात आधारवाडी जेलमध्ये बॅरेक क्रमांक १ च्या ५ नंबर सर्कलमध्ये शिक्षा भोगतोय. आरोपी कैदी संतोष साळुंखेही तिकडेच शिक्षा भोगत आहे.
सांगली : ५० लाखांच्या खंडणीसाठी शिक्षकाचं मुलासह अपहरण, पाच जणांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी रात्री साडे आठच्या सुमारास कैदी दानिश हा जेवण करत होता. यावेळी हल्लेखोर कैदी संतोष तंबाखु मळून हात झटकत होता. हे पाहून, “मी जेवण करतोय, तू तंबाखू झटकू नको”, असं दानिशने सांगितल्यावर संतोष भडकला. यानंतर त्याने जेवण बनवणाऱ्या दानिशला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली.
या हाणामारीत संतोषने दानिशचा एक दातही पाडला. दोन कैद्यांमध्ये झालेला हाणामारी पाहता पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दानिशवर रुग्णालयात उपचार सुरु असून संतोषवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT