रविवारी, ७ ऑगस्ट रोजी दिल्लीत निती आयोगाची बैठक झाली. या बैठकीतील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अनुपस्थितीने बिहारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता बळावली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जदयू आणि भाजप यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता असून, नितीश कुमार हे याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चा सुरू झाल्यानंतर आता नितीश कुमार यांचा पुढचा डाव काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जदयूचं संख्याबळ घटलं. नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री बनले, मात्र भाजपकडून जदयू फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप सुरू झाले. अलिकडेच जदयूचा राजीनामा देणाऱ्या आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला.
जदयूने थेट सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवरच गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जदयूचे आमदार मध्यावधी निवडणुकीसाठी तयार नाही. त्यातच नितीश कुमार यांनी केंद्राच्या एक दोन नव्हे तर तब्बल चार कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. त्यामुळे नितीश कुमार आता तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.
नितीश कुमार सोनिया गांधींच्या संपर्कात!
नितीश कुमारांनी भाजपच्या नेतृत्वापासून दुरावा ठेवला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क केल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील सुत्रांनी ‘आजतक’ला दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संपर्कात आहे. आरसीपी सिंह यांनी जदयूचा राजीनामा दिल्यापासून नितीश कुमारांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क सुरू केला.
गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजप यांच्यात सातत्याने धुसफूस होताना दिसत आहे. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळणार आणि राजदला सोबत घेऊन नितीश कुमार नवं सरकार स्थापन करण्याचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
आरपीसी सिंह प्रकरणाने जदयू-भाजपतील संबंध गेले विकोपाला
माजी केंद्रीय मंत्री आणि जनता दल युनायटेडचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्याकडे संपत्तीची माहिती मागवण्यात आली. त्यामुळे आरसीपी सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आरपीसी सिंह आणि भाजप नेत्यांमधील संबंध हे बिहारच्या राजकारणात सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांच्या मर्जीशिवाय ते नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले होते.
नितीश कुमार यांनी आरपीसी सिंह यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलं नाही आणि त्यामुळे आरपीसी सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर व्हावं लागलं. याच कारणामुळे नितीश कुमार आणि आरपीसी सिंह यांच्यात दुरावा वाढत गेला. आता आरपीसी सिंह यांच्या माध्यमातून जदयूला कुमकुवत करण्याचं प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप पक्षाकडून केला जातोय.
केंद्राचे चार कार्यक्रम ज्यामुळे नितीश कुमार भाजपपासून दूर जात असल्याचे मिळाले संकेत
गेल्या १५ दिवसाच्या काळात दिल्लीत केंद्राचे चार कार्यक्रम झाले. या चारही कार्यक्रमांकडे नितीश कुमारांनी पाठ फिरवली.
१७ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तिरंगा बद्दल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला नितीश कुमार गैरहजर होते. त्यानंतर २२ जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपानिमित्ताने आयोजित स्नेहभोजन समारंभालाही नितीन कुमार अनुपस्थित होते.
२५ जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याचंही निमंत्रण नितीश कुमार यांना पाठवण्यात आलं होतं. या कार्यक्रमालाही नितीश कुमारांनी पाठ दाखवली. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही नितीश कुमार अनुपस्थित होते.
ADVERTISEMENT