नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांचा मुलगा महाआर्यमन सिंधिया याने चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली ज्यानंतर महाआर्यमनवर एक मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाआर्यमन याची ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशन (GDCA) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सोमवारी एक प्रेस नोट जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, ‘ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक नवीन कार्यकारिणी तयार केली आहे, ज्यामध्ये अत्यंत अनुभवी माजी IAS प्रशांत मेहता यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आणि विशेषत: महाआर्यमन सिंधिया यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांची निवड ही तरुणांचा विचार करुन करण्यात आली आहे. जे अतिशय स्तुत्य पाऊल आहे.’
महाआर्यमनचे वडील ज्योतिरादित्य आणि आजोबा माधवराव सिंधिया यांचे क्रिकेटशी घट्ट नाते आहे. ज्योतिरादित्य सध्या ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक आहेत. त्यांनी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
काही दिवसांपूर्वी महाआर्यमनने वडिलांसह पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सिंधिया यांच्या घरी पोहोचले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आर्यमन पीएम मोदींच्या जवळ उभा आहे.
महाआर्यमन सिंधिया भविष्यात कौटुंबिक राजकीय वारसा सांभाळू शकेल, असे बोलले जात आहे. त्याने गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये वडील ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रचाराची धुराही सांभाळली होती. त्याचबरोबर तो अलीकडच्या काळात ग्वाल्हेरमधील राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत सिंधिया यांचा मुलगाही लवकरच राजकारणात प्रवेश करू शकतो, असे मानले जात आहे.
पेशवे पगडी परिधान करुन jyotiraditya scindia चं तुफान भाषण, पाहा काय म्हणाले मराठ्यांबाबत
मध्यप्रदेशमधील सर्वात प्रभावी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना गेल्या वर्षीच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं होतं. आतापर्यंत ते पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला होता.
खरं तर मध्यप्रदेशमध्ये ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या तेव्हा तिथे काँग्रेसचं सरकार आलं होतं. त्यामुळे पक्ष मुख्यमंत्री म्हणून आपली निवड करेल अशी आशा ज्योतिरादित्य सिंधिया यांना होती. मात्र, तसं न होता काँग्रेसने कमलनाथ यांना मुख्यमंत्री केलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या ज्योतिरादित्यांनी 2020 साली बंड करुन कमलनाथ यांचं सरकार पाडलं होतं. त्यावेळी ते भाजपच्या गोटात दाखल झाले आणि पर्यायाने मध्यप्रदेशात भाजपचं सरकार आलं.
याचाच मोबदला म्हणून भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतिरादित्य यांना नागरी उड्डाण मंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेतलं.
ADVERTISEMENT