मिथिलेश गुप्ता, कल्याण: दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण-तरुणीने अचानक भिवंडी-कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या युगुलाच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असावा त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
ADVERTISEMENT
याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्रशांत गोडे (वय 22 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत खाडीत उडी मारलेल्यातरुणीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हे प्रेमीयुगुल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकी घटना काय?
प्रशांत गोडे हा कल्याणहून भिवंडीला जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरून एका तरुणीसोबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास जात होता. मात्र, दुर्गाडी पुलावर येताच त्या दोघांनी दुचाकी पुलावरच बाजूला लावून अचानक पुलाच्या कठड्यावरून खाडीच्या पाण्यात उड्या मारल्या.
कोनगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तासाभरात प्रशांतचा मृतदेह खाडी पात्रातून बाहेर काढत भिवंडीच्या स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला.
Crime: पत्नीचे मामेभावासोबत अनैतिक संबंध, डॉक्टर पतीची आत्महत्या; पत्नी-सासूविरोधात गुन्हा दाखल
मृत प्रशांत हा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारा असून त्याच्या सोबत असलेल्या तरुणीच्या अद्यापही शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, या घटनेने प्रशांतच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
तसेच दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे हे शोधण्याचं आता पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात पोलीस वेगवेगळ्या बाजूने तपास करत असून लवकरच याबाबत नेमकी माहिती देण्यात येईल असं कोनगाव पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT