मुंबई: मुंबईतील (Mumbai) बोरिवलीमधील (Borivali) राम मंदिर सिग्नलजवळ एका तृतीयपंथावर धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना 28 जुलै रोजी रात्री उशिरा घडली आहे. दरम्यान, या हत्येनंतर इतर तृतीपंथीयांनी थेट निवस्त्र होऊन भर रस्त्यात आंदोलन सुरु केलं होतं. यामुळे येथील वाहतुकीचा बराच खोळंबा झाला होता.
ADVERTISEMENT
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच MHB पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि डीसीपी विशाल ठाकूर हे घटनास्थळी पोहचले. यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथीयांची समजूत काढली तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही दिलं. ज्यानंतर तृतीयपंथीयांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
दरम्यान, ज्या तृतीयपंथीयावर हल्ला करण्यात आला होता त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात मृत घोषित केलं.
याप्रकरणी MHB पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून याप्रकरणी त्यांनी कसून चौकशी देखील सुरु केली आहे. हा जीवघेणा हल्ला नेमका का करण्यात आला? याचा देखील पोलीस आता तपास करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणी झोन अकराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी अशी माहिती दिली की, ‘तृतीयपंथीयांच्या दोन गटात पैशावरुन वाद झाला होता. याच पैशाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये एका तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.’ असं दिलीप सावंत म्हणाले.
MHB पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक निलंबित
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर MHB पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक पी. जी. येले यांना निलंबित करण्यात आलं आहे. परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यामुळे बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी स्वत: ही निलंबनाची कारवाई केली आहे.
Thane: विषारी सापाशी खेळ, युवकाने गमावले प्राण; घटना मोबाईलमध्ये कैद
काही दिवसांपूर्वीच याच भागात एका वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, याच परिसरात हत्येसारखी मोठी घटना घडल्याने येथील गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक पी. जी. येले यांच्या निलंबनानंतर आता इथे लवकरच नव्या पीआयची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या पोलीस स्थानिकातील दुसऱ्या पीआयला या पोलीस स्थानकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT