पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या खोळंबल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फटका बसला. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दौरा रद्द केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून (25 नोव्हेंबर) विस्कळीत झाली आहे. दिवानखवटी ते विन्हेरे दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबून आहेत.
काही गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे गाड्या दोन ते चार तास उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मंगलोर एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांना बसला कोकण रेल्वेच्या वाहतुकीचा फटका
ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील बसला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज रत्नागिरी दौरा आहे.
रत्नागिरी दौऱ्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे कोकण कन्या एक्सप्रेसने निघाले, पण ओव्हर हेड वायर तुटल्यानंतर वाहतूक मंदावली आणि कोकण कन्या गाडी जवळपास 4 तास उशिराने धावत आहे.
यावर्षीच कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे वाहतुकीचा खोळंबा झालाय. ओव्हरहेड वायर तुटल्यानं कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिक ऐवजी डिझेल इंजिन उपलब्ध करून दिले जात असून, हळूहळू एक्सप्रेस गाड्या पुढे मार्गस्थ केल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वेरावल-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस 4 तास 24 मिनिटं उशिराने धावत आहे, तर कोकण कन्या एक्स्प्रेस 3 तास 30 मिनिटं उशिराने धावत असून, ही एक्स्प्रेस गाडी वीर स्थानकात थांबवली होती. सावंतवाडी एक्सप्रेस काही तास करंजाडी स्थानकात थांबवण्यात आली.
एलटीटी-मडगाव एक्सप्रेस साडेतीन तासांपासून सापे वामने स्थानकात थांबवण्यात आली आहे. सीएसएमटी-मंगलोर एक्सप्रेस साडेपाच तासांपासून दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आलेली आहे. तर मत्स्यगंधा एक्सप्रेस साडेचार तासांपासून सापे वामणे स्थानकात उभी आहे.
कोकण रेल्वे विस्कळीत : उदय सामंतांनी रद्द केला दौरा
उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. उदय सामंत कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबईहून रत्नागिरीकडे निघाले होते. मात्र, कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबल्यानं उदय सामंत हे पुन्हा मुंबईला निघाले आहेत. सामंत यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT