मुंबई: कोरोना संकटामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनेक नियम आखून दिले आहेत. याच नियमानुसार आता मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा देखील विराजमान होणार आहे. पण यंदा लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना फक्त ऑनलाइनच घेता येणार आहे. पण असं असलं तरी भाविकांना लालबागच्या राजाचा प्रसाद हा घरपोच मिळणार आहे.
ADVERTISEMENT
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, यंदा लालबागच्या राजाचा प्रसाद हा भाविकांना घरपोच मिळणार आहे. पण यासाठी ऑनलाइन बुकींग करावी लागणार आहे.
लालबागच्या राजाच्या प्रसादासाठी ऑनलाइन बुकिंग कशी करणार?
लालबागच्या राजाच्या प्रसादासाठी आज (7 सप्टेंबर) रात्रीपासून ऑनलाइन बुकिंग सुरु होणार आहे. रात्री 9 वाजेपासून या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात होणार आहे. भाविकांना जिओ मार्टवरुन या प्रसादाची बुकिंग करता येणार आहे.
लालबागच्या राजाचा प्रसाद मुंबई, एमएमआर रिजन आणि पुणे येथील भाविकांना मिळणार आहे. या विभागासाठीच ऑनलाइन बुकिंग स्वीकारलं जाणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.
मंडळाच्या अंदाजानुसार, साधारण 11 लाख भाविक ऑनलाईन बुकिंग करण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर मंडळाकडून प्रसादाची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. प्रसादात 100 ग्रॅमचे 2 लाडू मिळणार आहेत.
लालबागच्या राजाचं घेता येणार ऑनलाइन दर्शन:
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट घोंघावत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई पोलिसांनी लालबागसह गर्दी होणाऱ्या परिसरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील लालबाग, परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी होते. मात्र कोरोनामुळे भाविकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन न घेता फक्त ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात लालबाग-परळमध्ये गणेशभक्तांना ‘नो एण्ट्री’ असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने अशा स्वरुपाचे आदेश जारी केले आहेत.
Exclusive: लालबागच्या राजासाठी नवे दागिने, पाहा राजाच्या दागिन्यांचा First Look
विशेषतः लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी होत असते. यंदा लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सव पुन्हा साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने येथील गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांकडून मंडळांना फक्त ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासाठी युट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करण्याची सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उत्सव कालावधीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात यावं याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT