सुनील कांबळे, लातूर: आई आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करते. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी नेहमी धडपडत असते. मात्र लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथील एका आईने आपल्या 2 वर्षांच्या पोटच्या चिमुकल्याला विहिरीत फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. दरम्यान, पाण्यात बुडाल्याने मुलाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. दरम्यान, नेमका हा प्रकार का घडला व त्याचे कारण काय, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील केळगावजवळील राठोडा गावात रविवारी उशिरा हा प्रकार घडला. आरोपी माया व्यंकट पांचाळ (वय 25) हिला दोन वर्षांचा संपत व्यंकट पांचाळ हा मुलगा होता. पती व्यंकट पांचाळ हे लातूर येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत.
दररोज प्रमाणे व्यंकट पांचाळ हे कामावरून घरी आले असता आपला मुलगा कुठे गेला अशी विचारणा केली असता. त्याला जे उत्तर मिळालं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
यावेळी घराशेजारी असलेल्या शिंदे यांच्या विहिरीत मुलाला आपल्या पत्नीने फेकून दिले. अशी घटना त्याच्या समोर आली.
दरम्यान, या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना देण्यात आली तेव्हा घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक बी. आर. शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक गर्जे यांनी धाव घेतली. व्यंकट विश्वनाथ पांचाळ यांच्या फिर्यादीवरून मयत बालकाची आई माया पांचाळ हिच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. पतीने दिलेल्या फिर्यादीत, तसेच प्राथमिक माहितीमध्ये गुन्ह्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले, आरोपी महिलेची मानसिक स्थिती बरी नाही का? हे तपासात निष्पन्न होईल.
पती-पत्नीमध्ये सतत वाद…
पती व्यंकट पांचाळ आणि पत्नी माया पांचाळ यांच्यामध्ये सतत भांडण होत होते. दरम्यान, याच भांडणाच्या रागातून तिने आपल्या दोन वर्षीय मुलाला विहिरीत फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनेच्या आठ दिवसापूर्वीच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. पती व्यंकट पांचाळ हा एका खासगी कारखान्यात काम करतो.
पांचाळ दाम्पत्यांना एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या भांडणातून ही घटना घडल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तविला आहे. घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
Virar: नवऱ्यासोबतच्या भांडणाचा राग मुलीवर, बेदम मारहाणीत 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
पती औसा-लातूर येथे वास्तव्याला आहे. तर पत्नी माया ही राठोडा गावात राहत होती. दरम्यान, तिने रविवारी रात्री उशिरा दोन वर्षीय मुलाला शेजारच्या विहिरीत फेकले. असंही पोलिसांनी सांगितले.
घराशेजारीच असलेल्या शिंदे यांच्या विहिरीत एका चिमुकल्या मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. दरम्यान, याबाबतची माहिती निलंगा पोलिसांना देण्यात आली. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् पंचनामा करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आईनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित कुदळे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT