केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या विधानाने LGBTQ (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर) समुदाय नाराज झाला आहे. या विधानाला ‘होमोफोबिक’ म्हणत, LGBTQ उजवे कार्यकर्ते अशोक राव कवी यांनी राणेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
काय घडली नेमकी घटना?
शनिवारी निलेश राणे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे युवा सेनेतले सहकारी राहुल कनाल यांचा एक फोटो ट्विट केला. त्यावर त्यांनी असं लिहिलं होतं की सून आणता येत नाही म्हणून जावई आणला का? तर त्याआधी शुक्रवारी नितेश राणे यांनीही एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करायची परवानगी मिळाली म्हणून नाचत आहात की आदित्य ठाकरेंनी मुलीशी लग्न करायचं ठरवलं म्हणून नाचत आहात? या आशयाचं ट्विट केलं होतं. या दोन ट्विट बाबत आता LGBTQ समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
LGBTQ समुदायाच्या हक्कांसाठी लढणारे अशोक राव कवी काय म्हणाले?
नारायण राणे हे एक हुशार राजकारणारी आहेत. मात्र जी ट्विट्स त्यांच्या मुलांकडून केली जात आहेत ती काही योग्य नाहीत. कोणताही माणूस पर्यायाशिवाय भिन्नलिंगी किंवा समलैंगिक जोडीदार शोधत नाही. जी वक्तव्य केली गेली आहेत ती वक्तव्य चुकीचा संदेश देणारी आहेत त्याबात नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनीही माफी मागावी असं अशोक राव कवी यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंवर राणे बंधूंकडून कायमच टीका
आदित्य ठाकरेंवर राणे बंधू म्हणजेच नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघंही कायमच टीका करत असतात. आदित्य ठाकरे हे विधानसभेत जात असताना मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात निलेश राणे यांनी म्यांव म्यांव असा आवाज काढून त्यांना डिवचलं होतं. विधानसभेच्या प्रांगणात ही घटना घडली होती. आदित्य ठाकरे यांनी याकडे दुर्लक्ष केलं. एवढंच नाही तर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत का? याची DNA चाचणी केली पाहिजे. अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र यावेळी आदित्य आणि त्याच्या मित्राबाबत ट्विटमध्ये होमोफोबिक कमेंट केल्या आहेत. त्यामुळे LGBTQ समुदायाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
याआधी भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तुम्ही लेस्बियन आणि गे सभागृहाचे सदस्य म्हणून घेणार आहात का? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणे टीका झाली होती. आता नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या ट्विट्सवर टीका होते आहे.
ADVERTISEMENT