बारामतीजवळ दारुने भरलेला ट्रक उलटला, दारुचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची गर्दी

मुंबई तक

• 08:53 AM • 29 Oct 2021

सध्याच्या काळात माणुसकी कमी कशी होत चालली आहे याचा प्रत्यय बारामती तालुक्याती उंडवडी कडेपठार भागात आला. पहाटे साडेचार वाजल्याच्या दरम्यान दारुचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पलटल्यानंतर या भागातील तळीरामांची चांगलीच चंगळ झाली. अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरला मदत करायची सोडून या भागातील लोकांनी दारुच्या बाटल्या पळवण्यासाठी तोबा गर्दी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे बायकाही या गर्दीत सहभागी […]

Mumbaitak
follow google news

सध्याच्या काळात माणुसकी कमी कशी होत चालली आहे याचा प्रत्यय बारामती तालुक्याती उंडवडी कडेपठार भागात आला. पहाटे साडेचार वाजल्याच्या दरम्यान दारुचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पलटल्यानंतर या भागातील तळीरामांची चांगलीच चंगळ झाली. अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरला मदत करायची सोडून या भागातील लोकांनी दारुच्या बाटल्या पळवण्यासाठी तोबा गर्दी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे बायकाही या गर्दीत सहभागी झाल्या होत्या.

हे वाचलं का?

कडेपठार भागात झालेल्या या अपघातात ट्रकचे ड्रायव्हर आणि क्लिनर थोडक्याच बचावले. परंतू रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा ढिग पडल्याची बातमी आजुबाजूच्या परिसरात समजली आणि फुटकची दारु पळवण्यासाठी लोकांनी इकडे गर्दी केली. पिंपळी येथील एका कंपनीमधून हा ट्रक जळगावकडे निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने ट्रक उंडवडी कडेपठार येथील पवार ढाब्यासमोर चारीत उलटला. यात दारुचे ९५० बॉक्स भरलेले होते, याची किंमत ६५ लाख रुपये असल्याची माहिती गाडी चालक निलेश गोसावी व क्लिनर अंकुश बेंद्रे यांनी दिली.

दारुचा ट्रक उलटल्याची बातमी आजुबाजुच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या पळवून नेल्या. यात महिलां आणि मुलींनीही दारु पळवून नेली. चालक निलेश गोसावी क्लिनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांना दारु नेऊ नये यासाठी प्रयत्न केला. यावेळी चालकाला मारहाण करण्यात आली आणि गाडीची ताडपत्री धारधार हत्याराने फाडून नागरिकांनी पोतीच्या पोती दारु भरुन नेली.

चालक व क्लिनर यांना कोणीही गाडीतुन बाहेर काढण्यासाठी मदत केली नसल्यामुळे दारुपुढे माणुसकीला तिलांजली दिली, परंतु बारामती ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडुन पळ काढला.

    follow whatsapp