मुंबई: महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज या अधिवेशनातील पहिला दिवस पार पडला. परंतु यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो महाविकास आघाडीचं पायऱ्यांवरील आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरु असताना धनंजय मुंडेंनी बंडखोर आमदार संजय शिरसाट आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डिवचले आहे.
ADVERTISEMENT
संजय शिरसाट आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काय म्हणाले धनंजय मुंडे?
विधानसभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरु असताना गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, ५० खोके एकदम ओके अशा घोषणा विरोधक देत होते. यावेळी शिवसेने विरोधात बंडखोरी केलेले संजय शिरसाट तिथून जात होते त्यावेळी धनंजय मुंडेंनी ”संजय शिरसाट यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणा दिल्या. त्यामुळे धनंजय मुंडेंनी कुठेतरी शिरसाटांच्या जखमेवरती मीठ चोळल्याची चर्चा आहे.
त्यानंतर भाजपचे नेते आणि नुकतेच मंत्री झालेले सुधीर मुनगंटीवार पायऱ्यांवरुन जात असताना धनंजय मुंडेंनी पुन्हा घोषणा दिल्या. ”सुधीर भाऊंना चांगलं मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशी घोषणाबाजी धनंजय मुंडेंनी केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर खातेवाटप झाले. या खातेवाटपावरुन आणि मंत्रिपदावरुन शिंदे गटातील आमदारांची खदखद बाहेर आली होती त्यालाच विरोधी पक्षांनी टार्गेट केले आहे.
मोहित कंबोज यांच्या ट्विटने अधिवेशापूर्वीच खळबळ तर NCPचं उत्तर
भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल रात्री ट्विट करुन खळबळ उडवली. राष्ट्रवादीचा एक नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या जवळ जाणार असे ट्विट कंबोज यांनी केलं होतं. त्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे. ”मोहित कंबोज हा काही तत्त्ववेत्ता किंवा भविष्य सांगणारा नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार काहीतरी जुने घोटाळे बाहेर काढणार आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणार. राज्यात शेतकऱ्यांवर संकट आलं आहे त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. भंडाऱ्यात दुर्दैवी घटना घडली आहे त्याबाबत हे महाशय बोलत नाहीत असाही टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT