शिंदे-फडणवीस सरकार 2019 मध्येच यायला हवं होतं, पण… : एकनाथ शिंदे यांंचं मोठं विधान

मुंबई तक

• 11:06 AM • 29 Oct 2022

नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं. 2019 मध्येच शिंदे-फडणवीस सरकार यायला पाहिजे होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये आले होते. नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, […]

Mumbaitak
follow google news

नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं. 2019 मध्येच शिंदे-फडणवीस सरकार यायला पाहिजे होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये आले होते. नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे हे नेते उपस्थित होते.

हे वाचलं का?

नंदुरबार नगर परिषद इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “2019 मध्येच हे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत यायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे काही दिवसांआधी आम्ही हा निर्णय घेतला.”

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, “आमच्या सरकारनं सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जात आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत तीन महिन्याच्या आत आम्ही केली.”

चंद्रकांत रघुवंशींची विनंती अन् एकनाथ शिंदेंचा वायुवेग; नंदुरबारला ३ मिनिटात ७ कोटी मंजूर

उद्धव ठाकरे यांना टोला :

“6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना आम्ही मदत केली. रखडलेली विकासकामं तीन महिन्यात मार्गी लावली. आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही सर्वांना कामाला लावलं. सरकारमध्ये असलेल्या आणि नसलेल्या बाकी लोकांना देखील आम्ही कामाला लावलं”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध :

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे. राज्यातील विकास कामांना गती व चालना देण्याचे काम हे सरकार करीत असून हे सरकार आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार शहरासाठी भरघोस निधी :

नंदुरबार शहरातील रस्ते, पथदिवे, पाणी पुरवठा तसेच विविध विकासकामासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, तसेच नवापूर मधील 132 के.व्ही विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नंदुरबार नगर परिषदेची नूतन इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमातूनच केला मंत्रालयात फोन :

नंदुरबार, नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसाठी राज्य शासनाकडून येणं बाकी असलेला 7 कोटी 28 लाख रुपयांच्या निधीचा मुद्दा चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन करून तत्काळ आदेश काढण्याची भुमिका घेतल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून भूमिकेचं स्वागत केलं.

    follow whatsapp