मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात ३ मे पर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. राज यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भोंग्याच्या वादासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकी राज ठाकरे येणार नसल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं. (Maharashtra government has called an all-party meeting on loudspeakers controversy)
ADVERTISEMENT
राज्य सरकारने भोंग्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली असून, सकाळी ११.३० वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही हजर राहणार आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बैठकीला उपस्थित राहतील, असं बोललं जात होतं. मात्र, पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या राज ठाकरे या बैठकीला येणार नाही. त्यांच्याऐवजी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
काय म्हणाले आहेत राज ठाकरे?
‘मशिदीवरील भोंग्यांचा त्रास अख्ख्या देशाला होतो आहे. यात धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे जी काय अजान द्यायची असेल ती घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते का अडवता? प्रार्थना तुमची आहे तर आम्हाला का ऐकवता. जर सांगून तुम्हाला समजत नसेल की, भोंगे खाली उतरवा.. तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..’ असं राज ठाकरेंनी सांगत यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काय म्हटलं आहे?
मशिदींवरचे भोंगे हटवण्यासाठी मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नाकडे आम्हीही गांभीर्याने पाहतो आहोत. मशिदींवरच्या भोंग्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या बैठकीला बोलवण्यात आलं आहे अशी माहिती २० एप्रिलच्या पत्रकार परिषदेत दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
‘भोंग्यांचा प्रश्न नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्या अनुषंगाने सन 2015 आणि 2017 मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊड स्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले आहे. गृह खात्याकडे विविध ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने मी पोलिसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष आहे,’ असं वळसे-पाटील यांनी सांगितलं होतं.
आता आज या सगळ्या संदर्भात राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आता आज होणाऱ्या बैठकीत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीला भाजप, मनसे या दोन विरोधी पक्षांसह सत्तेतले तीन पक्षही सहभागी होणार आहेत. बैठकीत नेमकं काय ठरणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT