महाराष्ट्रात दिवसभरात पाच लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यातल्या 6 हजार 155 केंद्रांवर या लसी देण्यात आल्या आहेत. 26 एप्रिल या एका दिवसात हा रेकॉर्ड महाराष्ट्राने केला आहे. महाराष्ट्राचं लक्ष्य रोज 6 ते 7 लाख लसी देण्याचं आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचं प्रमाण वाढतं आहे. कोरोना व्हायरसमध्ये नवा म्युटंट आढळल्याने दुसऱ्या लाटेत कोरोना वेगाने पसरतो आहे. अशात लस देणं आणि लोकांना सुरक्षित करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे. लस तुटवडा होऊनही महाराष्ट्राने दिवसभरात 5 लाखांपेक्षा जास्त लसी देण्याचा रेकॉर्ड साधला आहे. देशात आज घडीला सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात केलं जातं आहे.
ADVERTISEMENT
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
मंगळवारी होणाऱ्या लसीकरणानंतर दीड कोटींचा टप्पा गाठणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे. आज दिवसभरात देण्यात आलेल्या 5 लाखांपेक्षा जास्त लसीकरणामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1 कोटी 48 लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
महाराष्ट्राला जेवढ्या जास्त लसी मिळतील तेवढं जास्त लसीकरण शक्य होणार आहे. कारण त्या अनुषंगाने राज्याने यंत्रणा तयार केली आहे. दिवसभरात राज्यात 6 हजार 155 केंद्रांवर लसीकरण झालं आहे. त्यातील 5 हजार 347 केंद्रं शासकीय होती. त्यामुळे लसीकरणाचा पुरवठा असाच वाढवत न्यावा अशी विनंतीही करण्यात आली आहे.
‘कोरोना व्हायरस आपल्या सहनशीलतेची परीक्षा पाहतोय एकत्र लढूयात’, ‘मन की बात’मधून मोदींचं जनतेला आवाहन
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लसींचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. महाराष्ट्रात लसींचा पुरवठा केंद्राकडून कमी झाल्याने या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रांवर रविवारी लसी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्या ठिकाणचं लसीकरण बंद होतं. अनेक नागरिक या गोष्टीमुळे चांगलेच संतापलेही होते. कारण लस घेण्यासाठी मोठी रांग लावायची आणि शेवटी लस नाहीये म्हटल्यावर तिथून निघून जायचं ही बाब अनेकांना अनुभवावी लागली. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनेक ज्येष्ठ नागरिकांचा संताप झाला. अशा सगळ्या परिस्थितीतही महाराष्ट्राने दिवसभरात 5 लाखांपेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. केंद्राकडून आणखी लसी वेळेवर आल्या तर लसी आणखी मोठ्या प्रमाणावर देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राकडे लसी, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची मागणी केली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लसींचा पुरवठा वाढवावा अशी मागणी केली.
ADVERTISEMENT