आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात सोमय्यांच्या अडचणी वाढणार?; गृहमंत्री काय म्हणाले?

मुंबई तक

• 09:58 AM • 06 Apr 2022

राज्यातील राजकारण भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपांभोवती फिरताना दिसत असून, आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केला. आयएनएस विक्रांत या मोडीत निघालेल्या युद्धनौकेबद्दल राऊतांनी केलेल्या आरोपाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही दखल घेतली आहे. माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “संजय राऊत यांनी एक क्लिप आणि एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्या […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील राजकारण भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपांभोवती फिरताना दिसत असून, आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केला. आयएनएस विक्रांत या मोडीत निघालेल्या युद्धनौकेबद्दल राऊतांनी केलेल्या आरोपाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही दखल घेतली आहे.

हे वाचलं का?

माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “संजय राऊत यांनी एक क्लिप आणि एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. तो निधी सरकारपर्यंत पोहोचला नाही. ही रक्कम ५२ कोटींच्या आसपास आहे. या प्रकरणात पोलीस विभाग संपूर्ण चौकशी करेल,” अशी माहिती त्यांनी दिली.

“आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की, राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर आणि त्यामधून राज्य अस्थिर करणं. सरकार अस्थिर करणं, असे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. ते प्रयत्न यशस्वी होणार नाही. हे सरकार पूर्णपणे पाच वर्ष चालेल,” असा दावा गृहमंत्र्यांनी केला.

“संजय राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांनाही आवाहन केलेलं आहे. तुम्ही (केंद्रीय यंत्रणा) जर पारदर्शक पद्धतीने काम करत असाल, तर या प्रकरणाचीही चौकशी करा, असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. केंद्रीय यंत्रणांकडून अशा पद्धतीने कारवाई झाल्याचं कधीही पाहिलं नाही. गेल्या वर्ष-दोन वर्षात हे सगळं चाललंय आहे. पण, हे देशाच्या स्थिरतेच्या दृष्टिकोणातून चांगलं नाही,” असं म्हणत त्यांनी थेट केंद्रावर निशाणा साधला.

“राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला नाही. कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित आहे. काही ठिकाणी हत्या आणि इतर घटना घडल्या. त्याबद्दल सरकार गांभीर्याने काम करत आहे. पण, छोटे-छोटे विषय काढून आणि आंदोलनं करून समाजात तेढ निर्माण करण्याचा, संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजात एक प्रकारची अस्वस्थता तयार होईल,” असा गंभीर इशारा दिलीप वळसे-पाटील यांनी दिला.

सोमय्यांवर आरोप करताना राऊत म्हणाले होते, “युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी निधी गोळा केला होता. तो पैसा राजभवनकडे जमा करू, असं ते म्हणाले होते. मात्र, तो पैसा जमा केला गेलाच नाही. तो पैसा सोमय्यांनी निवडणुकीत आणि मुलांच्या बांधकाम कंपनीत वापरला, ” असा खळबळजनक आरोप राऊतांनी केलेला आहे.

    follow whatsapp